15
शरीरातील स्त्रावापासून शुद्धता
याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: जेव्हा कोणाही माणसाच्या शरीरातून स्राव होत असेल, तर अशा प्रकारचा स्त्राव हा अशुद्ध आहे. त्याचे शरीर सतत स्राव बाहेर टाकीत असले किंवा अडवून ठेवीत असले, तरी तो मनुष्य अशुद्ध आहे. या स्रावामुळे तो मनुष्य अशुद्ध होतो:
ज्या बिछान्यावर तो झोपेल आणि ज्या बैठकीवर तो बसेल ती अशुद्ध होईल. जे कोणी अशा माणसाच्या अंथरुणाला स्पर्श करतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत ते अशुद्ध राहतील. स्रावामुळे अशुद्ध झालेला मनुष्य ज्या बैठकीवर बसला असेल त्या बैठकीवर जो कोणी बसेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. त्याने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे.
जो कोणी अशा मनुष्याला स्पर्श करेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
ज्या कोणा शुद्ध व्यक्तीवर असा मनुष्य थुंकेल, त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
ज्या वाहनांचा तो स्त्राव होणारा मनुष्य उपयोग करेल ते वाहन अशुद्ध होय, 10 आणि जो कोणी अशा माणसाच्या अंगाखालील वस्तूला स्पर्श करेल किंवा ती उचलेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
11 हात धुतल्याशिवाय स्त्राव होणारा मनुष्य जर कोणाला स्पर्श करेल, तर स्पर्श झालेल्या त्या मनुष्याने अवश्य आपली वस्त्रे धुवावीत आणि पाण्याने स्नान करावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
12 “असा मनुष्य ज्या मातीच्या पात्राला स्पर्श करेल ते अवश्य फोडून टाकावे आणि कोणत्याही लाकडाच्या भांड्याला त्याचा स्पर्श झाल्यास ते पाण्याने धुऊन घ्यावे.
13 “स्राव थांबल्यावर त्याने आपली वस्त्रे धुऊन, सात दिवसांच्या शुद्ध होण्याच्या विधीची सुरुवात करावी. त्याने आपली वस्त्रे धुवावी आणि वाहत्या पाण्यात स्नान करून शुद्ध व्हावे. 14 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घ्यावीत व सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर येऊन याजकाला ती द्यावीत. 15 याजकाने त्यातील एका पक्ष्याचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने त्याच्या स्त्रावासाठी याहवेहसमोर प्रायश्चित करावे.
16 “जर एखाद्या मनुष्याला वीर्यपात झाला, तर त्याने संपूर्ण शरीर पाण्याने धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. 17 ज्या वस्त्रांवर वा चामड्यावर वीर्य लागले असेल, ते अवश्य धुऊन टाकावे व सायंकाळपर्यंत ते अशुद्ध समजावे. 18 जर एखाद्या पुरुषाने स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवले आणि या प्रक्रियेत त्याचे वीर्यस्खलन झाले, तर दोघांनीही पाण्याने स्नान केले पाहिजे. ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील.
19 “स्त्री ॠतुमती होते, तेव्हा तिने विधिनियमानुसार सात दिवस अशुद्ध राहावे. त्या काळात जो कोणी तिला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
20 “याकाळात ती ज्या अंथरुणावर झोपेल किंवा बैठकीवर बसेल, ती सर्व अशुद्ध होतील 21 जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. 22 जो कोणी तिच्या बैठकीला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. 23 जो कोणी तिच्या अंथरुणाला किंवा बैठकीला स्पर्श करेल तो व्यक्ती सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.
24 “याकाळात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणारा पुरुष सात दिवस अशुद्ध राहील आणि ज्या बिछान्यावर तो झोपेल तो अशुद्ध समजावा.
25 “महिन्यात अनियमित वेळा किंवा मासिक पाळीच्या दिवसानंतरही जर ॠतुस्राव चालू राहिला, तर त्यामुळे मासिक पाळीच्या अशुद्धतेप्रमाणे ती या अशुद्ध स्त्रावात अशुद्धच राहील. 26 म्हणजे, नियमित मासिक पाळी चालू असलेल्या ॠतुस्रावाच्या काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल ते अशुद्ध होईल; आणि ज्या बैठकीवर बसेल ती ही अशुद्ध होईल. 27 जी व्यक्ती तिच्या अंथरुणाला वा बैठकीला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल. त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे आणि तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.
28 “जेव्हा ती स्त्री तिच्या स्त्रावातून शुद्ध होईल, तेव्हा तिने शुद्ध होण्यासाठी सात दिवस मोजावे, त्यानंतर ती शुद्ध होईल. 29 आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी; 30 याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण म्हणून याहवेहपुढे अर्पून तिच्या स्त्रावाच्या अशुद्धतेकरिता प्रायश्चित्त करावे.
31 “अशाप्रकारे इस्राएली लोकांना तू अशुद्धतेपासून दूर ठेवावे. आपल्यावर मरणाचा प्रसंग ओढवू नये म्हणून त्यांनी आपल्या अशुद्धतेमुळे त्यांच्यामध्ये ज्या निवासमंडपात मी राहतो तो अशुद्ध करू नये.”
32 स्राव किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो, त्याच्यासाठी हे नियम आहेत. 33 जी स्त्री ॠतुमती होते आणि जो कोणी अशा ॠतुमती असलेल्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवून विधिनियमानुसार अशुद्ध होतो, यासंबंधीचे हे नियम आहेत.