21
याजकांसाठी विशेष नियम
याहवेह मोशेला म्हणाले, “याजकांना म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की: तुमच्या लोकांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यावर कोणीही स्वतःला विधिनियमानुसार अशुद्ध करू नये, आपले जवळचे नातलग म्हणजे त्याची आई किंवा वडील, पुत्र किंवा कन्या, त्याचा भाऊ किंवा अविवाहित बहीण, जी त्याच्यावर अवलंबून आहे कारण तिला पती नाही—यांच्यासाठी तो स्वतःला अशुद्ध करू शकतो. याजक लोकांचा प्रमुख असल्यामुळे, त्याच्या विवाहाच्या द्वारे संबंधित लोकांसाठी त्याने स्वतःला अपवित्र करून अशुद्ध करू नये.
“ ‘याजकाने मुंडण करू नये किंवा दाढीची टोके छाटू नयेत किंवा शरीराला जखमा करून घेऊ नयेत. त्यांनी त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र राहावे आणि त्यांच्या परमेश्वराच्या नावाला काळिमा लावू नये. ते याहवेहला अन्नार्पण म्हणजे त्यांच्या परमेश्वराचे अन्न अर्पितात, म्हणून त्यांनी पवित्र राहावे.
“ ‘त्यांनी वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या किंवा त्यांच्या पतीला घटस्फोट दिलेल्या स्त्रियांबरोबर विवाह करू नये; कारण याजक त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र आहेत. त्यांना पवित्र मानावे, कारण ते तुमच्या परमेश्वराला अन्न अर्पण करतात. त्यांना पवित्र समजावे, कारण मी याहवेह पवित्र आहे—मीच आहे जो तुम्हाला पवित्र करतो.
“ ‘एखाद्या याजकाची कन्या वेश्याकर्म करून स्वतःला भ्रष्ट करते तर ती आपल्या पित्याला अशुद्ध करते, म्हणून तिला अग्नीत जाळून टाकावे.
10 “ ‘प्रमुख याजक, म्हणजे ज्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतण्यात आले आहे व जो याजकीय वस्त्रे घालण्यास पवित्र करण्यात आला आहे, त्याने शोक व्यक्त करण्याकरिता आपले केस मोकळे सोडू नयेत किंवा आपली वस्त्रे फाडू नये. 11 ज्या ठिकाणी मृतदेह असेल अशा ठिकाणी त्याने प्रवेश करू नये. मग तो त्याच्या वडिलांचा असो किंवा आईचा, त्याने स्वतःला अशुद्ध करू नये. 12 त्याच्या परमेश्वराचे पवित्रस्थान सोडू नये किंवा ते अपवित्र करू नये, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाद्वारे समर्पित करण्यात आलेला आहे. मी याहवेह आहे.
13 “ ‘त्याने कुमारिकेबरोबरच विवाह करावा. 14 त्याने विधवा, घटस्फोटित किंवा वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या स्त्रीसह विवाह करू नये, परंतु त्याने त्याच्या स्वतःच्याच वंशातील कुमारिकेशी विवाह करावा, 15 त्यामुळे तो त्याच्या लोकांमध्ये त्याचे वंशज अशुद्ध करणार नाही. मी याहवेह आहे, जो त्याला पवित्र करतो.’ ”
16 याहवेह मोशेला म्हणाले, 17 “अहरोनास सांग, ‘पिढ्यान् पिढ्या त्याच्या कुळातील शरीराने अपंग असलेल्या कोणीही अन्नार्पण करण्यासाठी परमेश्वराजवळ येऊ नये. 18 एखादा मनुष्य आंधळा, लंगडा, चपट्या नाकाचा, हातापायांना अधिक बोटे असलेला; 19 ज्याचा पाय किंवा हात तुटलेला आहे, 20 कुबडा, ठेंगणा, डोळ्यात कमतरता असलेला, त्वचेचे रोग असलेला व भग्नांड असून 21 तो अहरोन याजकाचा वंशज असला, तरी शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने याहवेहला अन्न अर्पिण्यास जाऊ नये; त्याच्यात कमतरता आहे; त्याने त्याच्या परमेश्वराजवळ अन्नार्पण करण्यासाठी जाऊ नये. 22 तरी त्याच्या परमेश्वराचे परमपवित्र अन्न व पवित्र अन्न तो खाऊ शकतो; 23 पण त्याला शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने पडद्यामागील परमपवित्रस्थानात किंवा वेदीजवळही जाऊ नये, त्याने तसे केल्यास, माझे पवित्रस्थान भ्रष्ट होईल, कारण त्यांना पवित्र करणारा मीच याहवेह आहे.’ ”
24 अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांना मोशेने हे सांगितले.