मलाखीची भविष्यवाणी
1
1 एक भविष्यवाणी: संदेष्टा मलाखी*मलाखी अर्थात् माझा संदेष्टा द्वारे याहवेहने इस्राएलला दिलेले वचन.
परमेश्वराच्या प्रीतीबद्दल इस्राएलला संदेह
2 याहवेह म्हणतात, “मी तुमच्यावर नितांत प्रेम केले आहे.”
पण यावर तुम्ही विचारता, “हे प्रेम तुम्ही कसे केले?”
याहवेह जाहीर करतात, “एसाव याकोबाचा सख्खा भाऊ नव्हता काय? तरी देखील मी याकोबावर प्रीती केली. 3 परंतु मी एसावाचा द्वेष केला आणि त्याचा डोंगराळ प्रदेश टाकाऊ भूमी केला व त्याचे वतन रानातील कोल्ह्यांकरिता सोडले.”
4 एसावाचा वंशज, एदोमाने म्हटले, “जरी आम्ही चिरडले गेलो आहोत तरी देखील, भग्न झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू.”
परंतु सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ते बांधतील, पण मी ते उद्ध्वस्त करेन, कारण त्या देशाचे नाव दुष्टाईचा देश आणि त्या लोकांवर नेहमीच याहवेहचा कोप राहील. 5 तू स्वतःच्या डोळ्याने बघशील व म्हणशील, ‘इस्राएलच्या सीमेपलीकडे देखील याहवेह महान आहेत!’
दोषपूर्ण अर्पणामुळे करार मोडला जातो
6 “पुत्र आपल्या पित्याचा आदर करतो, नोकर आपल्या धन्याचा आदर करतो. जर मी तुमचा पिता आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे? मी जर धनी आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
“ते तुम्ही याजक आहात, जे माझ्या नामाचा अनादर करतात.
“पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्या नामाचा अनादर कसा केला?’
7 “तुम्ही माझ्या वेदीवर भ्रष्ट अर्पणे आणता तेव्हा.
“परंतु तुम्ही विचारता, ‘आम्ही तुम्हाला कसे अमंगळ केले?’
“याहवेहचा मेज तुच्छ आहे असे तुमच्या म्हणण्याने. 8 जेव्हा तुम्ही वेदीवर आंधळे पशू अर्पण करता, हे चुकीचे नाही काय? जेव्हा तुम्ही वेदीवर लंगडे वा रोगट पशू अर्पण करता, हे चुकीचे नाही काय? हे अर्पण तुम्ही आपल्या राज्यपालांना करून पाहा! ते तुमच्यावर प्रसन्न होतील का? ते तुमचा स्वीकार करतील का?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
9 “मग तुम्ही विनंती करता, परमेश्वरा आम्हावर दया करा. पण अशा प्रकारची अर्पणे हातात घेऊन येता, तर ते तुमचा स्वीकार करतील का?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
10 “अहा, तुमच्यापैकी कोणीतरी मंदिराची दारे बंद करावी, म्हणजे तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक धूप जाळणार नाही! मी तुमच्यावर मुळीच प्रसन्न नाही, आणि तुमच्या हातातील अर्पणांचा स्वीकार करणार नाही.” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. 11 “जिथून सूर्य उगवतो व जिथे तो मावळतो तिथपर्यंतच्या सर्व राष्ट्रांमध्ये माझे नाम महान केले जाईल. प्रत्येक ठिकाणी माझ्या सन्मानार्थ सुवासिक धूप जाळण्यात येईल व शुद्ध अर्पणे वाहण्यात येतील, कारण माझे नाम सर्व राष्ट्रांमध्ये थोर होईल,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
12 “ ‘प्रभूचा मेज अशुद्ध आहे’ व ‘त्यावरील अन्न तुच्छ आहे,’ असे सांगून तुम्ही माझे नाम अपवित्र करता. 13 ‘किती हे ओझे आहे!’ असे म्हणून तुम्ही त्याकडे घृणेने नाक मुरडता,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
“जेव्हा तुम्ही जखमी, लंगडे आणि आजारी पशू आणता व ते अर्पणे म्हणून वाहता, मी ते तुमच्या हातून स्वीकारावे काय?” याहवेह असे म्हणतात. 14 “प्रभूला आपल्या कळपातील एखादा धष्टपुष्ट मेंढा असूनही व त्याचे अर्पण करण्याचे वचन देऊन, जो आजारी असलेला मेंढा अर्पण करतो, तो लबाड शापित असो. कारण मी परमथोर राजा आहे आणि माझे नाव सर्व देशांमध्ये अत्यंत भयनीय आहे.” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.