22
लग्नाच्या मेजवानीचा दाखला
येशूंनी परत त्यांना दाखला सांगितला: ते म्हणाले, “स्वर्गाचे राज्य, एका राजासारखे आहे ज्याने आपल्या मुलाच्या विवाह निमित्ताने मेजवानी तयार केली. ज्यांना आमंत्रित केले होते त्या सर्वांस मेजवानीसाठी यावे म्हणून राजाने दासांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्यांनी मेजवानीस येण्याचे नाकारले.
“तेव्हा त्याने आणखी काही दास पाठविले, ‘ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांना सांगा की मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल आणि पुष्ट गुरे कापली आहेत आणि सर्वकाही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या.’
“परंतु त्यांनी मुळीच लक्ष दिले नाही आणि एकजण आपल्या शेतावर, तर दुसरा आपल्या व्यापारासाठी निघून गेला. बाकीच्या आमंत्रितांनी तर राजाच्या दासांना पकडले, अपमानित वागणूक दिली आणि ठारही मारले. राजाला खूपच राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून दासांना ठार करणार्‍यांचा नाश केला. त्यांची शहरे जाळून टाकली.
“यानंतर राजा आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची मेजवानी तयार आहे, पण ज्यांना मी आमंत्रण दिले ते लोक या बहुमानास पात्र नाहीत. तेव्हा तुम्ही रस्त्यांच्या चौकामध्ये जा आणि तिथे जे दिसतील, त्यांना मेजवानीस घेऊन या.’ 10 राजाच्या आज्ञेप्रमाणे दास बाहेर गेले आणि चांगले वाईट, असे जे कोणी त्यांना रस्त्यांत सापडले, त्या सर्वांना ते मेजवानीस घेऊन आले आणि मेजवानीचा कक्ष आमंत्रितांनी भरून गेला.
11 “राजा पाहुणे मंडळीस भेटावयास आला, त्यावेळी एक मनुष्य विवाहोत्सवाचा पोशाख न घालताच आलेला दिसला. 12 राजाने त्या मनुष्याला विचारले, ‘मित्रा, लग्नाच्या पोषाखाशिवाय तू आत कसा आलास?’ तो मनुष्य स्तब्ध झाला.
13 “मग राजा आपल्या नोकरास म्हणाला, ‘या मनुष्याचे हातपाय बांधा आणि त्याला बाहेरच्या अंधारात फेकून द्या. त्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’
14 “कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”
कैसराला कर देण्याविषयी
15 मग परूशी लोक बाहेर गेले आणि येशूंना त्यांच्या बोलण्यात कसे पकडावे यासंबंधी चर्चा केली. 16 त्यानुसार परूश्यांनी आपल्या काही शिष्यांना हेरोदी*हेरोदी हेरोद राजाचा पक्ष गटाच्या लोकांबरोबर येशूंकडे पाठविले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता आणि भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाहीत. 17 तर आता आम्हाला हे सांगा की, कैसराला करहा कर रोमी राज्यातील लोकांसाठी होता, रोमी नागरीकांसाठी नव्हता. देणे योग्य आहे की नाही?”
18 पण त्यांचा हेतू काय आहे हे येशूंनी ओळखले. “अहो, ढोंग्यांनो,” येशू म्हणाले, “मला सापळ्यात पाडू पाहता काय? 19 कर भरण्यासाठी वापरलेले एक नाणे मला दाखवा.” आणि त्यांनी त्यांना दिनारचे एक नाणे दाखविले. 20 येशूंनी त्यांना विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?”
21 “कैसराचे!” त्यांनी उत्तर दिले.
“मग,” येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे, ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”
22 त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि मग ते त्यांना सोडून निघून गेले.
लग्न व पुनरुत्थान
23 त्याच दिवशी, पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी त्यांच्याकडे आले व प्रश्न करू लागले. 24 “गुरुजी, मोशेने आम्हाला सांगितले आहे की, एखादा मनुष्य, मूल न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी लग्न करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. 25 आता सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले, पण एकही मूल न होता तो मरण पावला. तेव्हा त्याची विधवा त्याच्या धाकट्या भावाची पत्नी झाली. 26 पण हीच गोष्ट दुसर्‍या व तिसर्‍या भावापासून सातव्या भावापर्यंत झाली. 27 सर्वात शेवटी ती स्त्री मरण पावली. 28 जेव्हा, पुनरुत्थान होईल तेव्हा ती कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?”
29 येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत आहात, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, ना परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता. 30 पुनरुत्थानामध्ये लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील. 31 पण आता मृतांच्या पुनरुत्थाना संदर्भात परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे हे तुम्ही वाचले नाही काय? 32 ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे,’निर्ग 3:6 तो मृतांचा परमेश्वर नसून जिवंतांचा आहे.”
33 सभोवार जमलेली गर्दी येशूंच्या उत्तरांनी विलक्षण प्रभावित झाली.
सर्वात मोठी आज्ञा
34 येशूंनी सदूकींना निरुत्तर केले, हे परूश्यांनी ऐकले, तेव्हा ते एकत्र जमले. 35 कोणी एक नियमशास्त्र तज्ञ आला व त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना हा प्रश्न विचारला: 36 “गुरुजी, मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे?”
37 येशूंनी उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’§अनु 6:5 38 हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे. 39 यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’*लेवी 19:18 40 सर्व नियम आणि संदेष्ट्यांची शिकवण या दोन आज्ञांवरच आधारित आहे.”
ख्रिस्त कोणाचे पुत्र आहेत?
41 एकदा परूशी लोक एकत्र गोळा झाले असताना, येशूंनी त्यांना विचारले, 42 “ख्रिस्ताबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? तो कोणाचा पुत्र आहे?”
“तो दावीदाचा पुत्र आहे,” त्यांनी उत्तर दिले.
43 येशूंनी विचारले, “मग दावीद त्याला आत्म्याद्वारे ‘प्रभू,’ असे कसे म्हणतो?
44 “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले:
“मी तुझ्या शत्रूंना
तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत
तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’स्तोत्र 110:1
45 जर दावीद त्यांना ‘प्रभू’ म्हणतो, तर ते त्याचा पुत्र कसा असू शकेल?” 46 यावर त्यांना काही उत्तर देता येईना आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.

*22:16 हेरोदी हेरोद राजाचा पक्ष

22:17 हा कर रोमी राज्यातील लोकांसाठी होता, रोमी नागरीकांसाठी नव्हता.

22:32 निर्ग 3:6

§22:37 अनु 6:5

*22:39 लेवी 19:18

22:44 स्तोत्र 110:1