4
पेरणी करणार्‍याचा दाखला
येशूंनी सरोवराच्या किनार्‍यावर शिकविण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा त्यांच्याभोवती जमा झालेला समुदाय इतका मोठा होता की, ते एका होडीत बसून किनार्‍यावरील लोकांना शिकवू लागले. त्यांनी अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकविल्या, त्यांच्या शिक्षणात त्यांनी सांगितले: “ऐका! एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटविली व त्याला पीक आले नाही. पण काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले, त्याची वाढ झाली आणि त्या काही ठिकाणी तीसपट, साठपट किंवा शंभरपट पीक आले.”
मग येशू म्हणाले, “ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.”
10 मग ते एकटे असताना बारा जणांनी आणि इतरांनी त्यांना दाखल्याबद्दल विचारले. 11 ते म्हणाले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्वगोष्टी दाखल्याद्वारेच सांगण्यात येतील. 12 यासाठी की,
“ते पाहत असले तरी त्यांना काही दिसत नाही,
आणि ते ऐकतात तर, परंतु काही समजत नाही;
कदाचित ते वळतील आणि त्यांची क्षमा होईल!”*यश 6:9, 10
13 नंतर येशू त्यांना म्हणाले, “तुम्हाला हा दाखला समजत नाही का? तर इतर दाखले तुम्हाला कसे समजतील? 14 शेतकरी वचनाची पेरणी करतो. 15 काही लोक त्या वाटेवर पडलेल्या बी प्रमाणे आहेत, जिथे वचन पेरले जाते. ते वचन लगेच ऐकतात, पण सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो. 16 काहीजण, खडकाळ जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. 17 पण वचनामुळे संकटे आली किंवा त्यांचा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. पण त्यांना मूळ नसल्यामुळे थोडा काळ टिकतात. 18 काही असे आहेत, की ते काटेरी झुडपांमध्ये पेरणी केलेल्या बियांप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात; 19 परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा व इतर गोष्टींची हाव यांची त्यांना भुरळ पडते आणि त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ येत नाही. 20 याउलट काहीजण उत्तम जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात, स्वीकार करतात, पीक देतात—जे पेरले होते त्यापेक्षा तीसपट, साठपट आणि शंभरपट पीक देतात.”
दिवठणीवरील दिवा
21 नंतर येशूंनी त्यांना म्हटले, “कोणी दिवा लावून मापाखाली किंवा खाटेखाली ठेवतो काय? त्याऐवजी, तुम्ही दिवठणीवर ठेवत नाही का? 22 असे काही झाकलेले नाही जे उघड होणार नाही किंवा असे काही गुप्त नाही जे जाहीर केले जाणार नाही. 23 ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.”
24 ते त्यांना पुन्हा म्हणाले, “तुम्ही जे ऐकता ते नीट ध्यानात घ्या. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल आणि त्यापेक्षा अधिक जास्त तुम्हाला देण्यात येईल. 25 कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, त्यांच्याजवळ जे असेल नसेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.”
वाढणार्‍या बियांचा दाखला
26 येशू आणखी म्हणाले, “परमेश्वराचे राज्य असे आहे. एक मनुष्य जमिनीवर बी विखरतो. 27 रात्र आणि दिवस, तो झोपतो किंवा उठतो, इकडे बी उगवते आणि कसे वाढते, ते त्याला कळतही नाही. 28 कारण जमीन स्वतः पीक उत्पन्न करते—पहिल्यांदा अंकुर, कणसे आणि मग कणसात दाणे भरतात. 29 अशा क्रमाने पीक तयार झाल्याबरोबर तो विळा चालवून पीक कापून नेतो, कारण हंगाम आलेला आहे.”
मोहरीच्या दाण्याचा दाखला
30 आणखी ते म्हणाले, “परमेश्वराचे राज्य कसे आहे किंवा कोणता दाखला देऊन त्याचे वर्णन करता येईल? 31 ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो पृथ्वीवरील सर्व दाण्यापैकी सर्वात लहान असला तरी, 32 तो दाणा वाढून त्याचे झाड होऊन बागेतील सर्वात मोठे झाड होते आणि त्याच्या मोठ्या फांद्यांवर आकाशातील पक्षी विसावा घेऊ शकतात.”
33 अशाच प्रकारच्या अनेक दाखल्यांद्वारे जसे ते समजू शकतील तसे येशू त्यांच्यासोबत वचनाद्वारे बोलले. 34 ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. परंतु एकांतात मात्र ते आपल्या शिष्यांना सर्व स्पष्ट करून सांगत असत.
येशू वादळ शांत करतात
35 त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” 36 तेव्हा लोकांची गर्दी मागे सोडून शिष्य येशूंना ते जसे होडीत होते तसेच त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले. इतर होड्याही त्यांच्याबरोबर होत्या. 37 थोड्याच वेळात सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या आणि होडी बुडू लागली. 38 येशू नावेच्या मागच्या भागास उशी घेऊन झोपी गेले होते. तेव्हा शिष्य त्यांना जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत, याची तुम्हाला काळजी नाही काय?”
39 मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला धमकाविले व लाटांना, “शांत हो” असे म्हटले! तेव्हा ताबडतोब वादळ शमले आणि सर्व शांत झाले.
40 त्यांनी शिष्यांना विचारले, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?”
41 शिष्य घाबरून गेले आणि एकमेकास म्हणू लागले, “हे आहेत तरी कोण? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात?”

*4:12 यश 6:9, 10