3
लेव्यांची कर्तव्ये
1 सीनाय डोंगरावर याहवेह मोशेबरोबर बोलले, त्यावेळी अहरोन व मोशे यांची वंशावळी ही होती.
2 अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार. 3 अहरोनाच्या ज्या पुत्रांचा याजक म्हणून अभिषेक करण्यात आला आणि निवासमंडपात सेवा करण्यासाठी समर्पित करण्यात आले, त्यांची ही वरील नावे होती. 4 नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली.
5 याहवेह मोशेला म्हणाले, 6 “लेवीच्या गोत्राने अहरोन याजकाला मदत करावी म्हणून तू त्यांना त्याच्यासमोर सादर कर. 7 त्यांनी सभामंडपात त्याच्यासाठी आणि संपूर्ण समुदायासाठी निवासमंडपाचे काम करून कर्तव्ये पार पाडावीत. 8 सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी. 9 यास्तव लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या हाती द्यावे; संपूर्ण इस्राएली लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आलेले आहेत. 10 याजकाची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याच्या पुत्रांची नेमणूक करावी. इतर दुसरे कोणी पवित्रस्थानाच्या जवळ आले, तर त्यास जिवे मारावे.”
11 आणि याहवेह मोशेला म्हणाले, 12 “इस्राएली लोकांतील प्रत्येक स्त्रीच्या पोटी प्रथम जन्मलेल्या पुत्रांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. लेवी लोक माझे आहेत, 13 कारण सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. ज्या दिवशी इजिप्तमध्ये मी सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, त्या दिवशी इस्राएलातील प्रत्येक प्रथम जन्मलेले मी माझ्यासाठी समर्पित करून घेतले, ते मनुष्य असो किंवा पशू, ते माझे आहेत, मीच याहवेह आहे.”
14 याहवेहने पुन्हा मोशेला सीनाय रानात सांगितले, 15 “आता तू लेवींची त्यांच्या घराण्यानुसार व कुळानुसार गणती करावी. एक महिन्याच्या व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणती करावी.” 16 याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने लेव्यांची गणती केली.
17 लेवीच्या पुत्रांची नावे ही:
गेर्षोन, कोहाथ आणि मरारी.
18 गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती:
लिब्नी आणि शिमी.
19 कोहाथाची कुळे:
अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल.
20 मरारीची कुळे:
महली आणि मूशी.
त्यांच्या घराण्यानुसार लेवीची कुळे ही होती.
21 लिब्नी व शिमी ही कुळे गेर्षोनापासून होती; ही गेर्षोनी कुळे होती.
22 एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 7,500 होती.
23 गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा.
24 गेर्षोनी घराण्याचा प्रमुख लाएलचा पुत्र एलीआसाफ होता.
25 सभामंडपात गेर्षोनी लोकांची जबाबदारी ही होती की, त्यांनी निवासमंडप व तंबू, त्याचे आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, 26 आणि अंगणाचे पडदे, निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा आणि दोर्या व त्याच्या वापराशी संबंधित जे सर्वकाही आहे यांची काळजी घ्यावी.
27 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जीएली हे कोहाथी कुळाचे होते; ही कोहाथची कुळे होती.
28 एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 8,600 होती.
पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी कोहाथी लोकांकडे होती.
29 कोहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेकडे डेरे द्यायचे होते.
30 उज्जीएलचा पुत्र एलीजाफान हा कोहाथी कुळांचा पुढारी होता.
31 कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाच्या सेवेत वापरली जाणारी उपकरणे, पडदा आणि त्यांच्या वापराशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यास ते जबाबदार होते.
32 अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ार हा लेवींचा प्रमुख पुढारी होता. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्यांवर त्याची नेमणूक करण्यात आली होती.
33 महली व मूशी हे कुळे मरारीपासून होते. ही मरारी कुळे होती.
34 एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या सहा हजार दोनशे होती.
35 अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता.
त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.
36 मरारी लोकांची नेमणूक निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, बैठका, त्याची सर्व उपकरणे आणि त्यांच्या वापरा संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी, 37 तसेच अंगणाच्या आजूबाजूच्या बैठका, तंबूच्या मेखा आणि दोर्या यावर करण्यात आली होती.
38 मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता.
इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे.
39 याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशे व अहरोन यांनी लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार एक महिन्याचे व अधिक वयाचे पुरुष यांची गणती केली, ते एकूण 22,000 होते.
40 मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांतील एक महिन्याच्या व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या सर्व पुरुषांची गणती करून त्यांच्या नावांची यादी करावी. 41 आणि इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेव्यांना माझ्यासाठी घ्यावे आणि इस्राएली लोकांच्या पशूतील सर्व प्रथम जन्मलेल्या वत्सांऐवजी, लेव्याच्या पशूंना माझ्यासाठी घ्यावे. मीच याहवेह आहे.”
42 याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली. 43 एक महिना व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषांची एकूण संख्या 22,273 होती.
44 याहवेह मोशेला आणखी म्हणाले, 45 “इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी लोकांना घे आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घ्यावे. लेवी लोक माझे असावेत. मीच याहवेह आहे. 46 273 इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले जे लेव्यांपेक्षा अधिक आहेत त्यांची खंडणी भरण्यासाठी, 47 प्रत्येकामागे पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच शेकेल*अंदाजे 58 ग्रॅ. घे; म्हणजेच वीस गेरा. 48 आणि इस्राएली लोकांतील जे अधिक होते त्यांच्या खंडणीचे पैसे अहरोन आणि त्याच्या पुत्रांना द्यावे.”
49 मोशेने लेव्यांपेक्षा जे अधिक होते त्यांच्याकडून त्यांच्या खंडणीचे पैसे गोळा केले. 50 इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांकडून त्याने पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार 1,365†अंदाजे 16 कि.ग्रॅ. गोळा केले. 51 याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले.