15
अर्पणांविषयी नियम
1 याहवेह मोशेला म्हणाले, 2 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: जो देश मी तुम्हाला तुमच्या वस्तीसाठी देत आहे त्यात तुम्ही प्रवेश कराल 3 आणि याहवेहसाठी सुवास म्हणून आपली खिल्लारे व गुरे यातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण कराल, मग ते होमार्पण किंवा यज्ञ असो, विशेष नवस असो किंवा स्वखुशीचे अर्पण किंवा सणाचे अर्पण असो. 4 अर्पण आणणार्याने याहवेहसमोर एक पाव हीन*अंदाजे 1 लीटर जैतुनाच्या तेलात मळलेल्या बारीक सपिठाचा एका एफाचा दहावा†अंदाजे 1.6 कि.ग्रॅ. भाग सादर करावा. 5 होमार्पण किंवा यज्ञासाठी एका कोकराबरोबर, पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस तयार करावा.
6 “ ‘मेंढ्याबरोबर एक एफाचे दोन भाग बारीक सपीठ, एकतृतीयांश हीन‡अंदाजे 1.3 लीटर जैतुनाच्या तेलात मळून अन्नार्पण तयार करावे, 7 आणि अन्नार्पण म्हणून एकतृतीयांश हीन द्राक्षारस, हे सर्व याहवेहला सुवास म्हणून अर्पण करावे.
8 “ ‘जेव्हा तुम्ही होमार्पण किंवा यज्ञ म्हणून, याहवेहला विशेष नवस किंवा शांत्यर्पण म्हणून एक तरुण बैल तयार करता, 9 बैलाबरोबर एफाचे तीन दशांश§अंदाजे 5 कि.ग्रॅ. बारीक सपीठ, अर्धा हीन*अंदाजे 1.9 लीटर जैतुनाच्या तेलात मळलेले असे अन्नार्पण आणावे. 10 आणि पेयार्पण म्हणून अर्धा हीन द्राक्षारस आणावा. हे याहवेहसाठी सुवासिक असे अन्नार्पण आहे. 11 प्रत्येक बैल किंवा मेंढा, प्रत्येक कोकरू किंवा तरुण बोकड अशा प्रकारे तयार करावे. 12 जितक्यांदा तुम्ही हे तयार करता, प्रत्येकासाठी असेच करावे.
13 “ ‘देशाच्या प्रत्येक रहिवासीने याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करताना या गोष्टी अशाच पद्धतीने कराव्या. 14 जेव्हा कोणी परदेशी किंवा तुमच्यामधील कोणीही इतर रहिवासी याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करतात, त्यांनीही तुम्ही ज्याप्रकारे करतात, त्याच पद्धतीने करावे, हे पुढील सर्व पिढ्यांपर्यंत असावे. 15 समुदायाने स्वतःसाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी सारखेच नियम पाळावे. येणार्या पिढ्यांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. तुम्ही व परदेशी याहवेहसमोर सारखेच आहात. 16 तुमच्यासाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी एकच नियम व कायदे असावेत.’ ”
17 याहवेह मोशेला म्हणाले, 18 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्यात तुम्ही जेव्हा जाल 19 आणि त्या भूमीचे फळ खाल, तेव्हा त्याचा एक भाग याहवेहसमोर सादर करावा. 20 तुमच्या मळलेल्या पिठाची पहिली भाकर सादर करावी आणि ती खळ्यातील अर्पण म्हणून सादर करावी. 21 तुमच्या मळलेल्या पिठाच्या पहिल्या भागाचे हे अर्पण तुम्ही याहवेहला तुमच्या भावी पिढ्यांपर्यंत करावे.
नकळत केलेल्या पापाबद्दल अर्पणे
22 “ ‘आता जर तुम्ही एक समुदाय म्हणून याहवेहने मोशेला दिलेल्या या आज्ञांपैकी कोणतीही आज्ञा पाळण्यास नकळतपणे अपयशी ठरला— 23 ज्या आज्ञा याहवेहने मोशेद्वारे तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या दिवशी त्या दिल्या तेव्हापासून भविष्यातही येणार्या पिढ्यांसाठी त्या असतील— 24 आणि जर समुदाय जागृत नसताना हे नकळत घडले असेल, तर संपूर्ण समुदायाने एका तरुण गोर्ह्याचे याहवेहला सुवासिक होमार्पण करावे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण आणि पापार्पणासाठी†म्हणजे शुद्धीकरणासाठी एक बोकड अर्पावा. 25 याजकाने सर्व इस्राएली समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल; कारण त्यांनी मुद्दाम पाप केले नव्हते आणि त्यांनी याहवेहला आपल्या पापाबद्दल अन्नार्पण व पापार्पण सादर केले आहेत. 26 सर्व इस्राएली समुदाय व त्यामध्ये राहणारे परदेश्यांची क्षमा केली जाईल, कारण सर्वांनी जे पाप केले ते नकळत झाले होते.
27 “ ‘परंतु जर केवळ एकाच व्यक्तीने नकळत पाप केले असेल, तर त्या व्यक्तीने पापार्पणासाठी एक वर्षाची शेळी आणावी. 28 ज्या व्यक्तीने नकळत पाप केले आहे त्या व्यक्तीसाठी याजकाने याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे आणि जेव्हा प्रायश्चित केले जाईल, तेव्हा त्या व्यक्तीला क्षमा करण्यात येईल. 29 जे कोणी नकळत पाप करतील त्यांच्यासाठी हाच एक नियम लागू असावा, ती व्यक्ती जन्मतः इस्राएली असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशी असो.
30 “ ‘परंतु जे कोणीही मुद्दाम पाप करतात, ते स्वदेशी असो किंवा परदेशी, ते याहवेहविषयी दुर्भाषण करतात, त्यांचे इस्राएली लोकांतून उच्छेदन करावे. 31 कारण त्यांनी याहवेहच्या शब्दाला तुच्छ मानले आहे आणि याहवेहच्या आज्ञा मोडल्या आहेत, त्यांचे खचितच उच्छेदन करावे; त्यांचा दोष त्यांच्यावर राहील.’ ”
शब्बाथ भंग करणार्यास मरणदंड
32 इस्राएली लोक रानात असताना, एक मनुष्य शब्बाथ दिवशी लाकडे गोळा करीत असताना सापडला. 33 तेव्हा ज्यांनी त्याला लाकडे गोळा करताना पकडले, त्यांनी त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळीसमोर आणले, 34 आणि त्यांनी त्याला ताब्यात ठेवले, कारण त्याचे काय करावे याविषयी त्यांना काही स्पष्ट माहीत नव्हते. 35 मग याहवेह मोशेला म्हणाले, “त्या मनुष्याने मरावे. सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर धोंडमार करावा.” 36 मग मोशेला याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार केली.
वस्त्रांना गोंडे
37 याहवेह मोशेला म्हणाले, 38 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: येणार्या सर्व पिढ्यांपर्यंत तुम्ही आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावे, प्रत्येक गोंड्यावर निळा दोरा असावा. 39 ते यासाठी की तुम्ही त्यांच्याकडे पाहावे व याहवेहच्या सर्व आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे, म्हणजे तुम्ही त्यांचे पालन करावे आणि आपल्या अंतःकरणाच्या व डोळ्यांच्या वासनांच्या मागे लागून व्यभिचार करू नये. 40 मग तुम्हाला माझ्या सर्व आज्ञांचे पालन करण्याची आठवण राहील आणि तुम्ही तुमच्या परमेश्वरासाठी पवित्र राहाल. 41 तुमचा परमेश्वर व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले तो मीच याहवेह आहे. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”