17
अहरोनाची काठी फुलते
याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांशी बोल व त्यांच्याकडून त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्‍याकडून एक काठी अशा बारा काठ्या घे. प्रत्येक पुरुषाचे नाव त्याच्या काठीवर लिही. लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्‍याची एक काठी असावी. सभामंडपात जिथे मी तुझी भेट घेत असतो, तिथे कराराच्या नियमाच्या कोशापुढे त्या काठ्या ठेवाव्या. ज्या पुरुषाची मी निवड करेन त्याच्या काठीला अंकुर फुटेल आणि इस्राएली लोक तुमच्याविरुद्ध सातत्याने जी कुरकुर करतात त्यापासून मी स्वतःची सुटका करेन.”
म्हणून मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या पुढार्‍यांनी त्याला बारा काठ्या दिल्या, त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्‍याकडून एक काठी आणि त्यांच्यामध्ये एक अहरोनाची काठी होती. मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या.
दुसर्‍या दिवशी मोशे मंडपात गेला आणि अहरोनाची काठी जी लेवी वंशाच्या वतीने ठेवली होती, ती केवळ अंकुरितच नव्हे तर त्याला कळी आली असून तिच्यावर बदाम पिकलेले दिसले. मग मोशेने त्या सर्व काठ्या याहवेहच्या समक्षतेतून इस्राएली लोकांकडे आणल्या. त्यांनी त्या पाहिल्या आणि प्रत्येक पुढार्‍याने आपआपली काठी घेतली.
10 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाची काठी कराराच्या नियमाच्या कोशापुढे परत ठेव, बंड करणार्‍यांना चिन्ह म्हणून ती तिथे ठेवावी. अशाने माझ्याविरुद्ध करीत असलेल्या त्यांच्या कुरकुरीचा शेवट होईल, म्हणजे ते मरणार नाहीत.” 11 याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणेच मोशेने केले.
12 इस्राएली लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरून जाऊ! आम्ही हरलो आहोत, आम्ही सर्व हरलो आहोत! 13 जो कोणी याहवेहच्या निवास मंडपाजवळ जरी येईल तरी त्याचा नाश होईल. आम्ही सर्व मरणार आहोत का?”