27
सलाफहादच्या कन्या
योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील माखीरचा पुत्र गिलआदचा पुत्र हेफेरचा पुत्र सलाफहादच्या कन्या, ज्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह होती, त्या पुढे आल्या आणि त्या मोशे, एलअज़ार याजक, पुढारी व सर्व मंडळीसमोर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या राहिल्या व म्हणाल्या, “आमचे पिता रानात मरण पावले. ते कोरहाच्या अनुयायांपैकी नव्हते, ज्यांनी एकत्र येऊन याहवेहविरुद्ध बंड केले, परंतु ते आपल्याच पापामुळे मरण पावले आणि त्यांना पुत्र नव्हते. त्यांना पुत्र नव्हते म्हणून आमच्या पित्याचे नाव त्यांच्या कुळातून का नाहीसे व्हावे? आमच्या पित्याच्या नातेवाईकांबरोबर आम्हालाही वतन द्यावे.”
तेव्हा मोशेने त्यांचा वाद याहवेहपुढे आणला, आणि याहवेह मोशेला म्हणाले, “सलाफहादाच्या कन्या जे म्हणतात ते बरोबर आहे. तू खचितच त्यांना त्यांच्या पित्याच्या नातेवाईकामध्ये त्यांचा वाटा म्हणून द्यावे आणि त्यांच्या पित्याचे वतन त्यांना दे.
“इस्राएली लोकांना सांग, एखादा मनुष्य मरण पावला व त्यांच्यामागे त्याला पुत्र नाही, तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे. आणि जर त्याला कन्या नसली, तर त्याचे वतन त्याच्या भावांना द्यावे. 10 आणि त्याला भाऊ नसला, तर त्याचे वतन त्याच्या पित्याच्या भावांना द्यावे. 11 जर त्याच्या पित्याला भाऊ नसले, तर त्याचे वतन त्याच्या कुळातील जवळच्या नातेवाईकाला द्यावे, म्हणजे ते त्याचे वतन होईल. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांस हा न्यायाचा नियम असावा.”
यहोशुआ मोशेचा उत्तराधिकारी
12 नंतर याहवेह मोशेला म्हणाले, “या अबारीम डोंगरावर जा आणि जो देश मी इस्राएली लोकांना दिला आहे तो पाहा. 13 तो पाहिल्यानंतर, जसा तुझा भाऊ अहरोन आपल्या लोकांत जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तू सुद्धा आपल्या लोकांना जाऊन मिळशील. 14 कारण सीन रानात पाण्याजवळ जेव्हा इस्राएली लोकांनी बंड केले, त्यावेळी त्यांच्या नजरेपुढे मला पवित्र म्हणून मानण्यास नाकारून तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेचा भंग केला.” (हेच सीन रानातील, कादेश येथील मरीबाहचे पाणी.)
15 मोशे याहवेहला म्हणाला, 16 “याहवेह परमेश्वर, जे सर्व जीवधार्‍यांना श्वास देतात, त्यांनी या समाजावर कोणा एकाची नेमणूक करावी 17 की त्याने त्यांच्यापुढे बाहेर जावे व आत यावे, जो त्यांना बाहेर नेईल व आत आणेल, जेणेकरून याहवेहचे लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे होणार नाहीत.”
18 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “नूनाचा पुत्र यहोशुआ, ज्या पुरुषामध्ये पुढारीपणाचा आत्मा वसतो, त्याला घे व त्याच्यावर आपला हात ठेव. 19 एलअज़ार याजक व संपूर्ण मंडळीसमोर त्याला उभे करून त्यांच्या समक्षतेत त्याची नेमणूक कर. 20 तुझे काही अधिकार त्याला दे म्हणजे सर्व इस्राएली समाज त्याचे आज्ञापालन करतील. 21 त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.”
22 याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने केले. त्याने यहोशुआला एलअज़ार याजक व सर्व समाजापुढे उभे केले. 23 आणि याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे मोशेने आपले हात यहोशुआवर ठेवून त्याची नेमणूक केली.