31
मिद्यानी लोकांवर सूड
1 मग याहवेह मोशेला म्हणाले, 2 “इस्राएली लोकांसाठी मिद्यानी लोकांचा सूड घे. त्यानंतर तू तुझ्या लोकांत मिळविला जाशील.”*ही इब्री भाषाशैली आहे, ज्याचा अर्थ तू मरण पावशील
3 तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “मिद्यानी लोकांशी युद्ध करावे म्हणून तुम्ही आपल्यातील काही पुरुषांना सिद्ध करा, म्हणजे ते याहवेहच्या वतीने त्यांचा सूड घेतील. 4 इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक हजार पुरुषांना युद्धासाठी पाठवा.” 5 तेव्हा युद्धासाठी बारा हजार पुरुष सशस्त्र झाले, प्रत्येक गोत्रातून एक हजार असे इस्राएलच्या कुळातून ते पुरविण्यात आले. 6 एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासाने आपल्याबरोबर पवित्रस्थानातील साहित्य व इशारा देण्यासाठी कर्णे घेतले होते, त्याच्यासह मोशेने प्रत्येक गोत्रातील एक हजार पुरुषांना युद्धात पाठवले.
7 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे ते मिद्यानी लोकांशी लढले व त्यांनी प्रत्येक पुरुषाला जिवे मारले. 8 ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले. 9 इस्राएली लोकांनी मिद्यानी स्त्रिया व लेकरे यांना कैद केले आणि मिद्यानी गुरे व शेरडेमेंढरे व मालमत्ता लूट म्हणून घेतले. 10 मिद्यानी लोक ज्या नगरांमध्ये स्थायिक होते त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या. 11 त्यांनी सर्व लोक व जनावरे यासह सर्व लूट व मालमत्ता घेतली, 12 आणि कैदी, लूट, जनावरे यांना मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेकडील छावणीत मोशे, एलअज़ार याजक आणि इतर इस्राएलच्या मंडळीसमोर आणले.
13 मोशे, एलअज़ार याजक आणि समाजाचे सर्व पुढारी त्यांना भेटण्यास छावणीबाहेर गेले. 14 पण सेनाधिकारी जे हजारांवरचे सरदार व शंभरांवरचे सरदार—जे युद्धावरून परतले त्यांच्यावर मोशे रागावला.
15 मोशेने त्यांना विचारले, “तुम्ही सर्व स्त्रियांना जिवंत राहू दिले काय? 16 त्यांनीच बलामाच्या सल्ल्यानुसार पेओरच्या प्रकरणात इस्राएली लोकांना याहवेहशी अविश्वासूपणा करण्यास भाग पाडले आणि याहवेहच्या लोकांना पीडेने मारले. 17 तर आता सर्व मुलांस जिवे मारा व पुरुषाशी संग ठेवलेल्या प्रत्येक स्त्रीला मारून टाका, 18 परंतु जिचा कधीही पुरुषाशी संग झाला नाही ती प्रत्येक मुलगी तुमच्यासाठी राखून ठेवा.
19 “जर कोणी एखाद्याला जिवे मारले किंवा जो जिवे मारला गेला त्याला स्पर्श केला त्यांनी सात दिवस छावणीबाहेर राहावे. तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी तुम्ही स्वतःस व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे. 20 चामडे, बोकडाचे केस किंवा लाकूड या सर्व वस्तूंसह प्रत्येक वस्त्र शुद्ध करावे.”
21 यानंतर एलअज़ार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, “याहवेहने मोशेला दिलेल्या नियमानुसार ही आज्ञा आहे: 22 सोने, चांदी, तांबे लोखंड, कथील, शिसे 23 आणि त्या प्रत्येक वस्तू ज्या अग्नीत टिकतात त्या अग्नीत टाकाव्या, मग त्या शुद्ध होतील. परंतु त्या शुद्धीकरणाच्या पाण्यानेही शुद्ध कराव्या. ज्या वस्तू अग्नीत टिकत नाहीत, त्या शुद्धीकरणाच्या पाण्यात घालून काढाव्या. 24 सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, मग तुम्ही छावणीत परत यावे.”
लुटीची वाटणी
25 मग याहवेह मोशेला म्हणाले, 26 “तू आणि एलअज़ार याजक व समाजाच्या कुटुंब प्रमुखांनी कैद केलेले सर्व लोक व जनावरे यांची मोजणी करावी. 27 लुटीचे दोन समान भाग करावेत. एक भाग लढाईवर गेलेल्या सैनिकांना व दुसरा भाग समाजातील इतरांना द्यावा. 28 युद्धास गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून, मनुष्य असो किंवा गुरे, गाढवे किंवा मेंढरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पाचशेमागे एक याप्रमाणे ते वेगळे कर. 29 त्यांच्या अर्ध्या हिश्श्यातून ते घे व याहवेहचा वाटा म्हणून तो एलअज़ार याजक याला दे. 30 इस्राएली लोकांच्या अर्ध्या हिश्श्यातून माणसे असो किंवा गुरे, गाढवे, मेंढरे किंवा इतर जनावरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पन्नासापैकी एक याप्रमाणे ते वेगळे कर. व लेवी लोक, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार आहेत त्यांना द्यावे.” 31 म्हणून याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशे व एलअज़ार याजकाने केले.
32 युद्धात सैन्याने घेतलेल्या लुटीतून राहिलेली लूट 6,75,000 मेंढरे, 33 72,000 गुरे, 34 61,000 गाढवे 35 आणि 32,000 स्त्रिया ज्यांनी कधीही पुरुषांबरोबर संग केला नव्हता.
36 युद्धात लढलेल्यांना मिळालेला अर्धा भाग हा होता:
3,37,500 मेंढरे, 37 ज्यापैकी याहवेहची खंडणी 675 मेंढरे होती;
38 36,000 गुरे, ज्यापैकी 72 याहवेहची खंडणी होती;
39 30,500 गाढवे, ज्यापैकी याहवेहची खंडणी 61 होती;
40 16,000 लोक, ज्यापैकी याहवेहची खंडणी 32 होती.
41 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने याहवेहचा हिस्सा म्हणून एलअज़ार याजकाला खंडणी दिली.
42 युद्धास गेलेल्या सैनिकांशिवाय इस्राएली लोकांना जो वाटा मोशेने वेगळा केला— 43 इस्राएल समाजाला मिळालेला अर्धा वाटा याप्रमाणे होता—3,37,500 मेंढरे, 44 36,000 गुरे, 45 30,500 गाढवे 46 आणि 16,000 लोक. 47 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांच्या वाट्यातील पन्नासापैकी एक, लोक आणि जनावरे असे मोशेने निवडून ते लेवी लोकांना दिले, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार होते.
48 नंतर सेनेच्या तुकड्यांवर जे अधिकारी होते—जे हजारांचे व शंभरांचे सेनापती होते ते मोशेकडे गेले 49 आणि मोशेला म्हणाले, “तुझ्या सेवकांनी आमच्या हाताखाली असलेल्या सैनिकांची मोजणी केली आणि त्यातून एकही व्यक्ती कमी झालेला नाही. 50 म्हणून आम्ही आम्हाला लुटीतून जे सोन्याचे दागिने मिळाले त्यातून तोडे, कड्या, अंगठ्या, कुंडले व माळा; आमच्यासाठी प्रायश्चिताचे अर्पण म्हणून याहवेहसमोर आणले आहेत.”
51 मोशे व एलअज़ार याजक यांनी ते सोने; घडीव दागिने त्यांच्यापासून स्वीकारले. 52 हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार यांच्याकडून स्वीकारलेले सोने जे मोशे व एलअज़ार याजकाने याहवेहला भेट म्हणून सादर केले, त्याचे वजन 16,750 शेकेल†अंदाजे 190 कि.ग्रॅ. इतके भरले. 53 प्रत्येक सैनिकाने स्वतःसाठी लूट घेतली होती. 54 मोशे आणि एलअज़ार याजकाने हजारांच्या व शंभरांच्या सरदारांकडून जे सोने स्वीकारले, ते त्यांनी इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून सभामंडपात आणले.