2
ज्ञानाचा नैतिक लाभ 
  1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील  
आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील,   
 2 सुज्ञानाच्या वाणीकडे लक्ष देशील,  
तुझे मन समंजसपणाकडे लावशील—   
 3 मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील,  
आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील,   
 4 आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील  
आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील,   
 5 तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल  
आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.   
 6 कारण याहवेह सुज्ञान देतात;  
त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते.   
 7 नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात,  
जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत.   
 8 कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात  
आणि त्यांच्या भक्तांचे मार्ग सुरक्षित ठेवतात.   
 9 तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर,  
आणि निष्पक्ष आहे—प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल.   
 10 सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल,  
आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल,   
 11 तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल,  
आणि सुज्ञता तुझे राखण करेल.   
 12 सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि  
शब्द विकृत करणार्या माणसांपासून दूर ठेवील.   
 13 ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी  
सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत,   
 14 ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो  
आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात,   
 15 ज्यांचे मार्ग विकृत आहेत  
आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत!   
 16 सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल,  
तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्या स्त्रीपासून,   
 17 जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे,  
आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.*किंवा करार तिच्या देवाचा   
 18 निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते  
आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात.   
 19 तिच्याकडे जाणारा परत येत नाही  
किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही.   
 20 यासाठी तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालशील,  
आणि नीतिमानांच्या मार्गांचे अवलंबन करशील.   
 21 कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील,  
आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील;   
 22 परंतु दुष्ट लोकांचा देशातून समूळ नायनाट होईल  
आणि तेथील अविश्वासू लोकांचे उच्चाटन केले जाईल.