शलोमोनाची नीतिसूत्रे
10
शलोमोनाची नीतिसूत्रे:
शहाणा मुलगा त्याच्या पित्याला सुखी करतो,
परंतु मूर्ख मुलगा त्याच्या आईला दुःख देतो.
 
दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते
परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते.
 
याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत,
परंतु दुष्टांची लालसा ते विफल करतात.
 
आळशी हात दरिद्री आणतो,
परंतु उद्योगी हात समृद्धी आणतो.
 
जो उन्हाळ्यात धान्याचा संचय करतो तो शहाणा पुत्र होय;
परंतु जो कापणीच्या हंगामात झोपून राहतो, तो लज्जेचे कारण होतो.
 
आशीर्वाद हे नीतिमानाच्या मस्तकावरील मुकुट आहेत,
परंतु दुष्ट मनुष्याच्या मुखात हिंसाचार दडलेला असतो.
 
आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक मनुष्याच्या नावाचा उपयोग करतात,*पहा उत्प 48:20.
परंतु दुष्ट मनुष्याचे नाव सडून नाहीसे होते.
 
सुज्ञ अंतःकरणाचा मनुष्य आज्ञेचे पालन करतो,
परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो.
 
सात्विक व सरळ जीवन जगणारा निर्भयतेने चालतो,
परंतु जो वाकड्या मार्गानी चालतो तो पकडला जाईल.
 
10 जो दुष्टतेने डोळे मिचकावितो तो दुःखाचे कारण होतो,
परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो.
 
11 नीतिमान मनुष्याचे मुख जीवनाचा झरा आहे,
परंतु दुष्टाचे मुख हिंसाचाराचे कोठार आहे.
 
12 द्वेष कलहास चेतावणी देतो;
परंतु प्रीती सर्व अपराधांवर आच्छादन टाकते.
 
13 बुद्धिमानाच्या ओठावर सुज्ञान वास करते,
परंतु विवेकहीन माणसाच्या पाठीला काठीच योग्य ठरते.
 
14 सुज्ञ ज्ञानाचा साठा करतात,
परंतु मूर्खाचे तोंड नाश ओढवून घेते.
 
15 धनवानाचे धन हे त्यांचे तटबंदीचे नगर आहे,
दारिद्र्य गरिबाचा नाश आहे.
 
16 नीतिमान मनुष्याचे वेतन जीवन आहे,
परंतु दुष्ट मनुष्याचे कमाई पाप आणि मृत्यू हेच आहेत.
 
17 जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो
परंतु जो सुधारणा नाकारतो, तो दुसर्‍यांची दिशाभूल करतो.
 
18 जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो,
आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय.
 
19 शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो;
पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात.
 
20 नीतिमान मनुष्याची जिव्हा उत्तम चांदीप्रमाणे असते;
परंतु दुष्टाच्या अंतःकरणास क्षुल्लक किंमत असते.
 
21 नीतिमान मनुष्याचे ओठ अनेकांचे पोषण करतात;
परंतु मूर्ख लोक विवेकाच्या अभावी नाश पावतात.
 
22 याहवेहच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मिळते,
त्यासाठी दुःखद परिश्रम करावे लागत नाहीत.
 
23 दुष्कर्म करण्यात मूर्खाला मौज वाटते,
परंतु सुज्ञ मनुष्य सुज्ञानात आनंदित होतो.
 
24 दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल;
नीतिमान मनुष्याच्या इच्छा फलद्रूप होतील.
 
25 वावटळ येते आणि निघून जाते, तसा दुष्ट नाहीसा होतो,
परंतु नीतिमान सर्वकाळ स्थिर उभा राहतो.
 
26 जशी आंब दातांस आणि धूर डोळ्यास,
तसा आळशी मनुष्य त्याला पाठविणाऱ्यास आहे.
 
27 याहवेहचे भय बाळगल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते,
परंतु दुष्टांच्या आयुष्याची वर्षे कमी केली जातील.
 
28 नीतिमानाची अपेक्षा त्याला आनंद देते,
परंतु दुष्टाची आशा फोल ठरते.
 
29 याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे,
परंतु जे दुष्कर्म करतात त्यांच्यासाठी तो नाश आहे.
 
30 नीतिमान लोक कधीही उपटून टाकले जाणार नाहीत,
परंतु दुष्ट लोक भूमीवर राहणार नाहीत.
 
31 धार्मिक मनुष्याच्या मुखाद्वारे सुज्ञानाचे फळ निघते;
परंतु विकृत जिभेला शांत केले जाईल.
 
32 नीतिमानांच्या ओठास कृपा कशी मिळवावी हे कळते,
परंतु दुष्ट लोकांचे मुख फक्त विकृतीच जाणते.
 

*10:7 पहा उत्प 48:20.