27
उद्याविषयी आज बढाई मारू नका;
कारण उद्या काय घडेल ते तुम्हाला ठाऊक नाही.
 
दुसरा कोणीतरी तुमची स्तुती करो, तुमच्या स्वतःच्या मुखाने नको;
बाहेरील व्यक्तीला ती करू द्या, पण तुम्ही स्वतःच्या ओठांनी करू नये.
 
दगड जड आहे आणि वाळू वजनदार असते,
परंतु मूर्खाने दिलेली चिथावणी या दोन्हींपेक्षाही जड असते.
 
क्रोध क्रूर असतो आणि राग पूरासमान असतो;
पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?
 
उघडपणे कान उघाडणी करणे,
गुप्त प्रीतीपेक्षा चांगले आहे.
 
मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात,
परंतु शत्रूची अनेक चुंबने कपटी होत.
 
एखाद्याला भरल्यापोटी मधसुद्धा बेचव लागतो,
परंतु भुकेल्या मनुष्याला कडू अन्नसुद्धा गोड लागते.
 
घर सोडून भटकणारा मनुष्य
घरटे सोडून भटकणार्‍या पक्ष्यासारखा आहे.
 
अत्तर आणि सुगंध मनाला आनंद देतात,
आणि अंतःकरणापासून दिलेल्या सल्ल्यातून
मित्राचा आनंद उसळून येतो.
 
10 तुमचा मित्र किंवा तुमच्या कुटुंबाच्या मित्राला कधीही सोडू नका,
आणि संकटसमयी नातेवाईकांच्या घरी जावू नका—
दूर राहणाऱ्या नातेवाईकांपेक्षा जवळचा शेजारी बरा.
 
11 माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे हृदय आनंदित कर;
म्हणजे जे मला तिरस्काराने वागवितात, मी त्यांना उत्तर देऊ शकेन.
 
12 सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो,
परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.
 
13 जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे;
जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे.
 
14 जर कोणी आपल्या शेजाऱ्याला भल्या पहाटे ओरडून अभिवादन केले,
तर ते त्याला शापासारखे वाटेल.
 
15 भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात
गळक्या छप्परासारखी आहे.
16 तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्‍याला ताब्यात ठेवण्यासारखे,
किंवा हाताने तेल धरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
 
17 जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते,
त्याप्रमाणे एक मनुष्य दुसर्‍याला सुधारतो.
 
18 जो अंजिराच्या झाडाची राखण करतो, तो त्या झाडाचे फळ खाईल.
आणि जे त्यांच्या मालकाचे संरक्षण करतात त्यांचा सन्मान होईल.
 
19 पाणी जसे चेहर्‍याचे प्रतिबिंब दर्शविते,
तसेच व्यक्तीचे जीवन त्याचे अंतःकरण दर्शविते,
 
20 मृत्यू आणि विध्वंस यांचे कधीही समाधान होत नाही,
तसेच मनुष्याच्या नेत्रांचेही नव्हे.
 
21 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते,
तशी लोकांची पारख, त्यांच्या प्रशंसेद्वारे होते.
 
22 मूर्खाचा तुम्ही कुटणीमध्ये भुगा केला,
मुसळात त्याला धान्यासारखे भरडले,
तरी त्याची मूर्खता तुम्हाला वेगळी करता येणार नाही.
 
23 आपल्या कळपाच्या स्थितीची योग्य जाणीव ठेवा,
तुमच्या पशूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्या;
24 कारण संपत्ती सर्वकाळ टिकत नाही,
आणि मुकुट पिढ्यान् पिढ्या सुरक्षित नसतो.
25 वाळलेले गवत काढून टाकले तेव्हा नवीन वाढ दिसून येते
आणि टेकड्यांवरील गवत एकत्रित केले जाते,
26 तेव्हा मेंढ्या तुम्हाला कपडे पुरवतील,
आणि शेतातील पैशाने शेळ्या मिळतील.
27 तुझ्या कुटुंबाला खाण्यासाठी आणि तुझ्या दासींचे पोषण करण्यासाठी
तुझ्याकडे शेळ्यांचे पुष्कळ दूध असेल.