स्तोत्रसंहिता
पुस्तक 1
1
स्तोत्रसंहिता 1–41
1 धन्य ते लोक,
जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत,
किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत,
आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.
2 पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे,
आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.
3 ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्या जलप्रवाहाजवळ लावलेले असते,
जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते
आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत.
त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.
4 परंतु दुष्ट तसे नाहीत.
ते वार्याने उडून जाणार्या
भुश्यासारखे आहेत.
5 म्हणून दुष्ट न्यायसभेत,
किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.
6 कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात,
परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.