स्तोत्र 3
दावीदाचे स्तोत्र. जेव्हा तो त्याचा पुत्र अबशालोम याच्यापासून पळाला. 
  1 याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे!  
कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत!   
 2 पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात,  
“परमेश्वर त्याची सुटका करणार नाही.” 
सेला
*सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे.    3 परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात.  
माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.   
 4 मी याहवेहचा धावा करतो,  
आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. 
सेला
    5 मी पहुडतो आणि झोप घेतो;  
मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात.   
 6 असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील,  
तरी मला मुळीच भीती वाटणार नाही.   
 7 याहवेह, उठा!  
हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा!  
माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा;  
त्या दुष्टांचे दात पाडून टाका.   
 8 कारण सुटका याहवेहपासूनच आहे.  
तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. 
सेला