स्तोत्र 15
दावीदाचे स्तोत्र. 
  1 याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल?  
तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?   
 2 ज्याचे चालणे निर्दोष आहे,  
जो धार्मिकतेचे आचरण करतो,  
जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;   
 3 जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही,  
जो आपल्या शेजार्यांचे वाईट करीत नाही,  
आणि इतरांना काळिमा लावत नाही;   
 4 जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो,  
याहवेहचे भय धरणार्यांचा सन्मान करतो,  
आणि जो स्वतःचे नुकसान होत असले  
तरी दिलेले वचन पाळतो;   
 5 जो व्याज न आकारता पैसे उसने देतो;  
जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही,  
जो कोणी या गोष्टी करतो  
तो कधीही ढळणार नाही.