स्तोत्र 21
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. 
  1 याहवेह, तुमच्या सामर्थ्यांमुळे राजा केवढा हर्ष पावतो.  
तुम्ही दिलेल्या विजयामुळे तो अत्यंत उल्लासतो!   
 2 कारण त्याचे मनोरथ तुम्ही पूर्ण केले आहेत;  
त्याने मागितलेली एकही गोष्ट तुम्ही अमान्य केली नाही. 
सेला
    3 उत्कृष्ट आशीर्वादाने तुम्ही त्याचे स्वागत केले;  
तुम्ही त्याच्या मस्तकावर शुद्ध सोन्याचा राजमुकुट घातला.   
 4 त्याने तुमच्याजवळ जीवनाची मागणी केली—  
तुम्ही त्याला युगानुयुगाचे आयुष्य दिले.   
 5 तुम्ही त्याला विजय आणि बहुमान दिला;  
तुम्ही त्याला ऐश्वर्य व वैभव दिले.   
 6 सर्वकाळचे सुख देऊन तुम्ही त्याला संपन्न केले  
आणि तुमच्या समक्षतेचा आनंद तुम्ही त्याला दिला.   
 7 कारण राजाचा भरवसा याहवेहवर आहे;  
सर्वोच्च परमेश्वराच्या अक्षय प्रीतीमुळे  
तो कधीही ढळणार नाही.   
 8 तुमचा द्वेष करणारे तुमचे सर्व शत्रू तुमच्या हाती सापडतील.  
तुमचा उजवा हात तुमच्या विरोधकांचा ताबा घेईल.   
 9 तुम्ही युद्ध करण्यासाठी जेव्हा प्रगट व्हाल,  
तेव्हा तुम्ही अग्नीच्या भट्टीमध्ये भस्म केल्यागत त्यांना नष्ट कराल.  
आपल्या क्रोधाने याहवेह त्यांना गिळंकृत करतील,  
याहवेहचा अग्नी त्यांना भस्म करेल.   
 10 तुम्ही त्यांची संतती पृथ्वीवरून,  
त्यांचे वंशज मानवजातीतून कायमचे नाहीसे कराल.   
 11 ही माणसे जरी तुमच्याविरुद्ध कट रचतात,  
आणि कुटिल योजना आखतात, परंतु ते यशस्वी होणार नाहीत.   
 12 जेव्हा तुमचे धनुष्य ताणून तुम्ही सरळ त्यांच्यावर रोखाल  
तेव्हा पाठ दाखवून पळण्यास तुम्ही त्यांना भाग पाडाल.   
 13 याहवेह, तुम्ही आपल्या शक्तीने उंचविले जावो;  
आम्ही तुमच्या सामर्थ्याचे गुणगान व स्तुतिगान करू.