स्तोत्र 26
दावीदाचे स्तोत्र. 
  1 याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा,  
मी दोषरहित जीवन जगलो;  
याहवेह, मी न डगमगता  
तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.   
 2 याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा,  
माझे मन आणि हृदयाची पारख करा.   
 3 कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो  
आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.   
 4 कपटी लोकांसोबत मी बसत नाही  
किंवा ढोंगी लोकांची संगत मी धरत नाही.   
 5 दुष्कर्म करणार्यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात  
आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही.   
 6 मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन  
आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन,   
 7 म्हणजे उंच आवाजाने तुमची उपकारस्तुती करेन  
आणि तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करेन.   
 8 याहवेह, मला तुमचे निवासस्थान आवडते,  
इथेच तुमचे वैभव वसती करते.   
 9 पातकी लोकांसोबत माझ्या जीवाला,  
आणि रक्तपिपासू लोकांसोबत माझे प्राण घेऊ नका.   
 10 त्यांच्या हातात दुष्ट योजना आहेत,  
त्यांचा उजवा हात लाचेने भरलेला आहे.   
 11 मी तर माझे जीवन निर्दोषतेने जगेन;  
मला मुक्त करा आणि माझ्यावर कृपा करा.   
 12 माझे पाय सपाट जमिनीवर स्थिर आहेत;  
महासभेत मी याहवेहची जाहीरपणे स्तुती करेन.