स्तोत्र 36
संगीत दिग्दर्शकासाठी. याहवेहचा सेवक दावीदाचे स्तोत्र. 
  1 दुष्टांच्या पापांबद्दल  
माझ्या हृदयात याहवेहचा संदेश आहे.  
त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे  
मुळीच भय नसते.   
 2 ते स्वतःच्या नजरेत अशी आत्मस्तुती करतात की,  
त्यांना आपला दोष दिसत नाही व ते आपल्या पापाचा द्वेष करीतच नाहीत.   
 3 त्यांचा प्रत्येक शब्द कपटाचा आणि अनीतीचा असतो;  
शहाणपणा आणि चांगुलपणा करण्यात ते अपयशी होतात.   
 4 ते दुष्ट योजनांचे कट रचीत रात्रभर जागे राहतात,  
ते स्वतःला पापी मार्गासाठी समर्पित करतात,  
आणि जे चुकीचे आहे ते नाकारत नाहीत.   
 5 याहवेह तुमची प्रीती स्वर्गापर्यंत,  
व तुमची सत्यता आकाशापर्यंत पोहोचली आहे.   
 6 तुमचे नीतिमत्व विशाल पर्वतासारखे आहे,  
तुमचे न्याय अथांग खोलीसारखे आहेत.  
याहवेह, तुम्ही मनुष्य आणि प्राण्यांची जोपासना करता.   
 7 हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे!  
सर्व मानवजात तुमच्या पंखांच्या छायेत आश्रय घेते.   
 8 तुमच्या भवनातील विपुलतेतून तुम्ही त्यांना तृप्त करता;  
आपल्या आनंदाच्या नद्यांचे पाणी तुम्ही त्यांना पाजता.   
 9 कारण जीवनाचा झरा तुमच्याजवळ आहे;  
तुमच्या प्रकाशानेच आम्हाला प्रकाश मिळतो.   
 10 जे तुम्हाला ओळखतात त्यांच्यावर तुमची प्रीती,  
व जे सरळ अंतःकरणाचे त्यांच्यावर तुमचे नीतिमत्व असू द्या.   
 11 त्या गर्विष्ठ लोकांनी मला पायदळी तुडवू नये,  
दुष्टांचे हात मला बाहेर ढकलून देऊ नये.   
 12 पाहा, दुष्कर्म करणारे कसे खाली पडले आहेत—  
खाली फेकलेले, आता पुन्हा उठू शकणार नाहीत!