स्तोत्र 38
दावीदाचे स्तोत्र. एक याचिका.
1 याहवेह, तुम्ही क्रोधाने मला शासन करू नका.
संतापून मला दंड करू नका.
2 तुमचे बाण माझ्या शरीरात खोल रुतले आहेत;
तुमचे हात माझ्यावर जड झाले आहेत.
3 तुमच्या संतापामुळे माझे शरीर रोगजर्जर झाले आहे;
माझ्या पातकांमुळे माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही.
4 माझे दोष इतके भारी आहेत की
ते वाहून नेणे अशक्य आहे.
5 माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे,
माझ्या जखमा सडून त्यास दुर्गंधी सुटली आहे.
6 मी वाकून गेलो आणि वेदनेने त्रस्त झालो आहे;
मी दिवसभर शोक करीत असतो.
7 माझ्या पाठीचा दाह होत आहे;
माझ्या अंगी अजिबात आरोग्य राहिलेले नाही.
8 मी पार गळून व चिरडून गेलो आहे;
माझ्या हृदयाच्या वेदनेने मी कण्हत आहे.
9 प्रभू माझी तीव्र इच्छा काय आहे, हे तुम्ही जाणता;
माझा प्रत्येक उसासा तुम्ही ऐकता.
10 माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती म्लान होत आहे;
मी आंधळा होत आहे असे मला वाटते.
11 माझे प्रियजन आणि माझे मित्र माझ्या आजारामुळे मजपासून दूर राहतात;
माझे कुटुंबीय माझ्यापासून दूर उभे राहतात.
12 माझा जीव घेऊ पाहणारे त्यांचे जाळे रचतात,
मला इजा करणारे माझ्या नाशाबद्दल बोलतात;
ते दिवसभर फसवणूक आणि लबाडी करतात.
13 परंतु मी ऐकू न येणार्या बहिर्यासारखा झालो आहे;
बोलता न येणार्या मुक्या माणसासारखा मी झालो आहे.
14 ज्याला ऐकू येत नाही आणि
ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, अशा माणसासारखा मी आहे.
15 याहवेह, मी माझी भिस्त तुमच्यावर ठेवली आहे;
प्रभू माझ्या परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्या.
16 कारण मी म्हटले, “माझे पाऊल घसरले,
तेव्हा मजपुढे प्रौढी मिरविणार्यांना आनंद मिळू देऊ नका.”
17 कारण मी कोसळण्याच्या बेतात आहे
आणि माझे दुःख सतत मजबरोबर आहे.
18 मी माझी पातके पदरी घेतो;
माझ्या पापामुळे मी दुःखी आहे.
19 अनेक लोक विनाकारण माझे शत्रू*किंवा कट्टर शत्रू झाले आहेत;
विनाकारण माझा द्वेष करणारे अनेक आहेत.
20 माझ्या चांगुलपणाची फेड ते दुष्टाईने करीत आहेत
आणि मी सत्याच्या बाजूने उभे राहिलो,
तरीही ते माझा द्वेष करीत आहेत.
21 याहवेह, मला सोडू नका;
परमेश्वरा, मजपासून दूर जाऊ नका.
22 माझे प्रभू, माझे तारणारे, लवकर या
आणि त्वरेने मला साहाय्य करा.