स्तोत्र 46
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत.
1 परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत;
संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.
2 पृथ्वी उलथीपालथी झाली
आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले,
3 सागरांच्या जलांनी गर्जना केल्या,
आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही.
सेला
*सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे 4 आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते;
तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात.
5 परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील;
प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील.
6 राष्ट्रे खवळली, राज्ये कोलमडली;
त्यांच्या मोठ्या गर्जनेने पृथ्वी विरघळून जाते.
7 सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत;
याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत.
सेला
8 या आणि आमचे याहवेह करीत असलेली अद्भुत कृत्ये पाहा;
त्यांनी पृथ्वीचा नाश कसा केला आहे.
9 दिगंतापर्यंत युद्धे
ते बंद करतात.
ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात;
ते रथांना†किंवा ढालींना अग्नीत भस्म करतात.
10 ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा;
राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल.
पृथ्वीवर माझी महिमा होईल.”
11 सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत;
याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत.
सेला
*स्तोत्र 46:3 सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे
†स्तोत्र 46:9 किंवा ढालींना