स्तोत्र 48
एक गीत. कोरहाच्या पुत्रांची एक स्तोत्र रचना. 
  1 याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये,  
त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत.   
 2 त्यांचे शिखर मनोहर आहेत,  
ज्यात संपूर्ण पृथ्वी आनंदित आहे,  
सीयोन पर्वत उत्तरेकडील झाफोन*झाफोन कनानी लोकांचे अतिपवित्र डोंगर पर्वतासारखेच उंच आहे,  
जे राजाधिराजाची नगरी आहे.   
 3 परमेश्वराने स्वतःला तिच्या राजमहालांमध्ये  
उंच आश्रयदुर्ग असे तिला प्रकट केले आहे.   
 4 ज्यावेळी राजांनी आपली सैन्ये एकवटली,  
ज्यावेळी ते एकत्र होऊन आगेकूच करीत आले.   
 5 त्यांनी हिला पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले;  
भयभीत होऊन त्यांनी पळ काढला.   
 6 त्या ठिकाणी त्यांना कापरे भरले;  
स्त्रीला होणार्या प्रसूतीच्या वेदनांसारख्या वेदना त्यांना होऊ लागल्या.   
 7 पूर्वेकडील वार्याने तार्शीशच्या गलबतांच्या नष्ट व्हाव्यात,  
त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा नाश केला.   
 8 आम्ही जे ऐकले होते,  
आणि आम्ही जे प्रत्यक्ष पहिले आहे  
सर्वशक्तिमान याहवेहच्या नगरात,  
आमच्या परमेश्वराच्या नगरात:  
परमेश्वर सर्वकाळासाठी  
तिला स्थिर करतील. 
सेला
    9 परमेश्वरा, तुमच्या मंदिरात,  
आम्ही तुमच्या प्रेमदयेचे चिंतन करतो.   
 10 हे परमेश्वरा, तुमच्या नावाप्रमाणे,  
तुमची स्तुती देखील पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहे.  
तुमचा उजवा हात नीतिमत्तेने परिपूर्ण आहे.   
 11 तुमच्या न्यायकृत्यांमुळे  
सीयोन पर्वत आनंद करो;  
यहूदाहची नगरे हर्ष करोत.   
 12 सीयोनेभोवती फिरा, तिची फेरी मारा,  
तिचे बुरूज मोजा.   
 13 तिची तटबंदी पाहा  
आणि तिच्यातील राजवाडे न्याहाळून पाहा,  
म्हणजे तुम्हाला तिचे वर्णन करून  
तुमच्या पुढील पिढीला सांगता येईल.   
 14 कारण हेच आमचे सनातन परमेश्वर आहेत;  
ते अखेरपर्यंत आमचे मार्गदर्शक राहतील.