स्तोत्र 57
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीद शौलाच्या उपस्थितीपासून निसटून गुहेत लपून बसला त्या संदर्भाचे आहे. 
  1 माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा.  
कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे;  
संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या  
छायेखाली आश्रय घेईन.   
 2 जे मला निर्दोष ठरवितात,  
त्या सर्वोच्च परमेश्वराचा मी धावा करेन.   
 3 ते स्वर्गातून साहाय्य पाठवून माझे तारण करतील;  
जे माझा पाठलाग करतात त्यांचा ते तिरस्कार करतात; 
सेला
*सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे  परमेश्वर त्यांची प्रीती आणि विश्वासूपणा पाठवून देतील.   
 4 सिंहांनी मला घेरले आहे;  
ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत,  
ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवार आहे  
अशा हिंसक स्वभावाच्या मनुष्यांमध्ये मी पडलो आहे.   
 5 हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत;  
तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.   
 6 माझ्या पावलांसाठी त्यांनी सापळा लावला आहे—  
संकटात मी वाकून गेलो होतो.  
माझ्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला होता—  
परंतु ते स्वतःच त्यात पडले आहेत. 
सेला
    7 हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे,  
माझे अंतःकरण खंबीर आहे;  
मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.   
 8 हे माझ्या जिवा, जागृत हो!  
अगे सारंगी, आणि वीणे, जागृत व्हा!  
मी प्रातःकाळाला जागृत करेन.   
 9 हे प्रभू, मी प्रत्येक राष्ट्रात तुमची स्तुती करेन,  
मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.   
 10 कारण तुमचे वात्सल्य महान असून ते गगनमंडळाला भिडले आहे;  
तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.   
 11 हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत;  
तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.