स्तोत्र 64
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
1 हे परमेश्वरा, माझे गार्हाणे ऐका;
शत्रूंच्या भयापासून माझ्या जिवास सुरक्षित ठेवा.
2 दुष्टांच्या षडयंत्रापासून आणि गुन्हेगार टोळक्यांच्या
कारस्थानापासून मला लपवा.
3 तलवारीप्रमाणे ते आपल्या जिभांना धारदार करतात
आणि बाणांप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या कटुशब्दांनी लक्ष्य करतात.
4 दबा धरून ते निरपराध्यांवर बाण सोडतात;
ते निर्भयपणे अकस्मात त्यांच्यावर मारा करतात;
5 दुष्कृत्य करण्यास ते एकमेकांना प्रोत्साहन देतात;
सापळे आखण्यासाठी ते गुप्तपणे एकत्र जमतात;
ते म्हणतात, “ते*ते किंवा आम्हाला कोण पाहणार?”
6 ते कुटिल योजना बनवून म्हणतात,
“आता आम्ही उत्तम योजना तयार केली आहे!”
मानवी अंतःकरण आणि हृदय समजणे कठीण आहे.
7 परंतु स्वतः परमेश्वरच त्यांचा बाण मारतील;
अचानक ते घायाळ होतील.
8 परमेश्वर त्यांची जीभ त्यांच्याच विरुद्ध करतील
आणि त्यांचा नाश करतील.
जे सर्व त्यांना पाहतील, ते उपहासाने आपले डोके हालवतील.
9 मग सर्व मानव घाबरतील;
ते परमेश्वराच्या कृत्यांची थोरवी गातील;
आणि त्यांनी केलेल्या चमत्काराविषयी मनन करतील.
10 पण नीतिमान लोक याहवेहमध्ये आनंद करतील
व त्यांचा आश्रय घेतील,
सरळ हृदयाचे त्यांचे स्तवन करतील!