स्तोत्र 66
संगीत दिग्दर्शकासाठी. एक गीत. एक स्तोत्र.
1 अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, आनंदाने परमेश्वराचा जयजयकार करा!
2 त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा;
ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा.
3 परमेश्वराला म्हणा, “तुमची कृत्ये किती अद्भुत आहेत!
तुमच्या सामर्थ्यामुळे
तुमचे शत्रू तुम्हाला दबकतात.
4 पृथ्वीवरील सर्व लोक तुमच्यासमोर नतमस्तक होतील;
ते तुमच्या गौरवांची गीते गातील,
ते तुमच्या नावाच्या गौरवांची गीते गातील.”
सेला
5 या आणि पाहा, परमेश्वराने काय केले,
त्यांनी लोकांच्या बाबतीत किती अद्भुत कृत्ये केली!
6 त्यांनी समुद्रात त्यांच्यासाठी कोरडी भूमी तयार केली;
ते जलातून पायी पलीकडे गेले—
यास्तव त्यांच्यामध्ये आपण हर्ष करू या.
7 आपल्या सामर्थ्याने ते सदासर्वकाळ राज्य करतात,
प्रत्येक राष्ट्रांना ते न्याहाळून पाहतात—
की बंडखोरांनी त्यांच्याविरुद्ध विद्रोह करू नये.
सेला
8 अहो सर्व लोकहो. परमेश्वराची स्तुती करा,
त्यांची स्तुतिस्तोत्रे ऐकू येवो.
9 कारण आमचे जीवन त्यांच्या हाती आहे
आणि ते आमची पावले घसरू देत नाही.
10 हे परमेश्वरा, तुम्ही आमची परीक्षा घेतली;
चांदी शुद्ध करतात, तसे तुम्ही आम्हाला शुद्ध केले आहे.
11 तुम्ही आम्हाला कारागृहात आणले
आणि आमच्या पाठीवर भारी ओझी लादली.
12 तुम्ही लोकांना आमची डोकी तुडवून जाऊ दिले;
आम्ही अग्नी आणि प्रलय यामधून गेलो,
परंतु तुम्ही आम्हाला बाहेर काढून समृद्ध भूमीवर आणले आहे.
13 मी तुमच्या मंदिरात होमार्पणे घेऊन,
माझे नवस फेडण्यासाठी येणार आहे—
14 कारण मी संकटात होतो, तेव्हा माझ्या ओठांनी अभिवचन दिले
आणि माझ्या मुखाने मी ते विदित केले.
15 म्हणूनच पुष्ट पशूंची तसेच मेंढ्याची होमार्पणे
तुमच्याकडे आणेन;
मी गोर्हे आणि बोकडांचे अर्पण करेन.
सेला
16 अहो तुम्ही, जे परमेश्वराचे भय बाळगता, ते या आणि ऐका;
त्यांनी माझ्यासाठी काय काय केले ते सर्व मी तुम्हाला सांगेन.
17 साहाय्यासाठी मी मुखाने त्यांचा धावा केला;
आणि माझ्या जिभेवर त्यांची स्तुती होती.
18 मी माझी पातके माझ्या अंतःकरणात ठेवली असती,
तर परमेश्वराने माझा धावा ऐकला नसता;
19 परंतु परमेश्वराने ते ऐकले,
त्यांनी माझ्या प्रार्थनेच्या विनंतीकडे लक्ष दिले आहे.
20 परमेश्वराचा धन्यवाद असो,
त्यांनी माझी प्रार्थना अस्वीकार केली नाही,
आणि माझ्यावर प्रीती करण्याचे नाकारले नाही.