स्तोत्र 79
आसाफाचे एक स्तोत्र.
हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे;
त्यांनी तुमचे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे,
आणि यरुशलेम नगरी नासधुशीचा ढीग झाली आहे.
तुमच्या सेवकांचे मृतदेह उघड्यावर पडून आहेत,
ते पक्ष्यांचे भक्ष्य झाले आहेत,
तुमच्या भक्तांचे मास वन्यपशूंचा आहार झाला आहे.
त्यांनी लोकांचे रक्त यरुशलेमच्या सभोवती
पाण्याप्रमाणे वाहविले आहे,
मृतांना पुरण्यासाठी कोणीही जिवंत नाही.
आमच्या शेजार्‍यांसाठी व सभोवती असणार्‍यांसाठी,
आम्ही तिरस्काराचे, तुच्छतेचे आणि उपहासाचे पात्र झालो आहोत.
 
हे याहवेह, किती काळ? तुम्ही आमच्यावर सदासर्वकाळ संतप्त राहाल काय?
तुमचा क्रोधाग्नी केव्हापर्यंत पेटलेला राहणार आहे?
अशा राष्ट्रांवर,
जी राज्ये तुमची प्रार्थना करण्याचे नाकारतात,
जे तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत;
अशा राष्ट्रांवर तुमच्या क्रोधाचा वर्षाव करा.
त्यांनी याकोबाला गिळंकृत केले आहे
आणि त्याच्या मातृभूमीचा विध्वंस केला आहे.
 
आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल आम्हाला दोषी धरू नका;
तुमची कृपा लगेचच आमच्या वाट्याला येऊ द्या,
कारण आमची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
हे आमच्या उद्धारक परमेश्वरा,
तुमच्या नावाच्या गौरवाकरिता आम्हाला साहाय्य करा;
तुमच्या नामाकरिता
आमची पापक्षमा करा व आम्हाला मुक्त करा.
10 इतर राष्ट्रांनी का म्हणावे,*हा प्रश्न स्तोत्रात चार वेळा विचारण्यात आला आहे 42:3, 10 आणि 115:2
“यांचा देव कुठे आहे?”
 
आमच्या डोळ्यादेखत या राष्ट्रांना प्रगट करा,
की तुमच्या लोकांच्या या भीषण कत्तलीचा तुम्ही सूड घेता.
11 बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका;
मरणदंड झालेल्याची सुटका करून तुम्ही आपल्या सामर्थ्याची थोरवी सिद्ध करा.
12 हे प्रभू, तुमची निंदा करणार्‍या या शेजार्‍यांचा
सातपट सूड त्यांच्या झोळीत घाला.पवित्र शास्त्रातील एक विशेष संज्ञा
13 मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले,
सदासर्वकाळ तुमचा धन्यवाद करू;
एका पिढीपासून अनेक पिढ्यांपर्यंत,
आम्ही तुमचे उपकारस्मरण करीत राहू.

*स्तोत्र 79:10 हा प्रश्न स्तोत्रात चार वेळा विचारण्यात आला आहे 42:3, 10 आणि 115:2

स्तोत्र 79:12 पवित्र शास्त्रातील एक विशेष संज्ञा