स्तोत्र 82
आसाफाचे एक स्तोत्र.
परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे;
त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:
 
तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार,
अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार?
सेला
दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा,
गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.
दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा;
दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.
 
इतर “दैवतां” ना काहीही कळत नाही, काहीही समजत नाही.
ते अंधकारात चालतात;
पृथ्वीचे सर्व पाये डळमळीत झाले आहेत.
 
“मी म्हटले, ‘तुम्ही “दैवते” आहात;
तुम्ही सर्वोच्च परमेश्वराचे पुत्र आहात.’
परंतु तुम्ही मर्त्य मानवांप्रमाणेच मराल;
आणि इतर शासकाप्रमाणे तुमचे पतन होईल.”
 
हे परमेश्वरा, उठा आणि जगाचा न्याय करा,
कारण समस्त राष्ट्र तुमचे वतन आहे.