स्तोत्र 84
संगीत निर्देशकाकरिता. गित्तीथ*शीर्षक: बहुतेक संगीत संबंधित एक शब्द वर आधारित. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. 
  1 हे सर्वशक्तिमान याहवेह,  
तुमचे निवासस्थान किती रम्य आहे!   
 2 याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी,  
मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे;  
माझा जीव व माझा देह  
जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.   
 3 हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा,  
तुमच्या वेद्यांजवळ  
चिमणीला घरटी बांधण्याचे,  
व निळवीला देखील आपली पिल्ले ठेवण्याचे  
ठिकाण सापडले आहे.   
 4 जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत;  
ते निरंतर तुमचे स्तवन करतात. 
सेला
    5 ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत,  
ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत.   
 6 ते बाका दरीतून†बाका दरी अर्थात् रडण्याची दरी जात असताना,  
ती त्यांना झर्यांचे स्थान होईल;  
शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.   
 7 सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत,  
त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल.   
 8 याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका;  
याकोबाच्या परमेश्वरा, माझे ऐका. 
सेला
    9 हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या ढालीवर दृष्टी टाका;  
आपल्या अभिषिक्तावर कृपादृष्टी करा.   
 10 तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस,  
इतर कुठेही घालविलेल्या सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे;  
दुष्टाईच्या मंडपात राहण्यापेक्षा,  
माझ्या परमेश्वराच्या भवनाचा द्वारपाल होऊन राहण्यात मला अधिक आनंद आहे.   
 11 कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत;  
ते आम्हाला कृपा व गौरव देतात;  
जे निष्कलंक असतात,  
त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.   
 12 सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात,  
ते कितीतरी धन्य होत.