स्तोत्र 92
एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित. 
  1 याहवेहची स्तुती गाणे,  
आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.   
 2 प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची,  
आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,   
 3 दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे,  
आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे.   
 4 हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता;  
तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे.   
 5 हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत!  
तुमचे विचार किती गहन आहेत!   
 6 मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही;  
मूर्खांना हे समजत नाही की,   
 7 दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात  
व त्यांची भरभराट होते,  
तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.   
 8 परंतु याहवेह तुम्ही सदासर्वकाळ सर्वोच्च आहात!   
 9 हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा,  
निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल,  
आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.   
 10 परंतु तुम्ही माझे शिंग*शिंग सामर्थ्याचे चिन्ह रानबैलासारखे उंच केले आहे;  
नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.   
 11 माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पाहिला;  
माझ्या विरोधकांची दाणादाण माझ्या कानांनी ऐकली.   
 12 नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील,  
ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;   
 13 जे याहवेहच्या घरात रोपलेले,  
आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील.   
 14 वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील,  
आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.   
 15 ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत;  
ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही.”