स्तोत्र 98
एक स्तोत्र.
याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा,
कारण त्यांनी अद्भुत कार्य केले आहे;
त्यांच्या उजव्या हाताने व पवित्र बाहूंनी
तारण मिळविण्याचे कार्य केले आहे.
याहवेहने त्यांचे तारण सर्व पृथ्वीला दाखविले आहे,
आणि राष्ट्रांसमक्ष आपली नीतिमत्ता प्रकाशित केली आहे.
इस्राएलवरील त्यांची प्रीती
आणि त्यांच्या विश्वसनीयतेचे त्यांना स्मरण झाले आहे;
पृथ्वीच्या सर्व सीमांनी
आपल्या परमेश्वराने केलेले तारण पाहिले आहे.
 
अगे पृथ्वी, याहवेहकरिता अत्यानंदाने हर्षोल्लास कर,
संगीतासह उचंबळून हर्षगीत गा;
वीणेवरील संगीताच्या साथीने याहवेहचे स्तवन करा,
वीणेच्या तालात आणि गीतांच्या सुरात गा,
शिंगे आणि कर्णे हर्षनादाचा गजर करोत—
याहवेह जे राजा आहेत, यांच्यापुढे आनंदाचा जयघोष करा.
 
महासागर व त्यामधील सर्व स्तुतीचा हर्षनाद करोत,
तसेच पृथ्वी आणि त्यावर राहणारे सर्व प्राणीही करोत.
नदीच्या लाटा टाळ्या वाजवोत,
डोंगर व टेकड्या परमेश्वरासमोर हर्षगान करोत;
ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत;
कारण पृथ्वीचा रास्त न्याय करण्यासाठी ते येत आहेत.
ते जगाचा आणि सर्व मनुष्यप्राण्यांचा
न्याय त्यांच्या धार्मिकतेने व समानतेने करतील.