स्तोत्र 111
याहवेहचे स्तवन होवो.
 
जिथे नीतिमान एकत्र येऊन सभा आयोजित करतात,
तिथे मी संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचे स्तवन करेन.
 
याहवेहचे कार्य किती उदात्त आहेत,
ते त्या अतिमहान कृत्यांचे मनन करतील.
गौरवशाली व वैभवशाली आहेत याहवेहची कृत्ये,
आणि त्यांची नीतिमत्ता सर्वकाळ टिकते.
याहवेहनी आपल्या या कृत्यांना अविस्मरणीय केले आहे;
ते कृपाळू व दयाळू आहेत.
जे त्यांचे भय धरतात त्यांना ते अन्नाचा पुरवठा करतात;
ते आपला करार नेहमी स्मरणात ठेवतात.
 
त्यांच्या कृत्यांचे सामर्थ्य त्यांच्या लोकांना प्रकट होण्यास,
त्यांनी अन्य राष्ट्रांची भूमी त्यांना वतनादाखल दिली.
त्यांच्या हाताने केलेली सर्व कृत्ये न्याय्य आणि विश्वसनीय असतात;
त्यांचे सर्व नियम विश्वासयोग्य असतात.
ते नियम सदासर्वकाळ अटळ आहेत,
सत्य आणि सात्विकतेला अनुसरून तयार केलेले आहेत.
त्यांनी आपल्या लोकांना मुक्तता दिली आहे;
त्यांनी आपला करार अनंतकाळासाठी स्थापित केला आहे—
त्यांचे नाव पवित्र व भयावह आहे.
 
10 याहवेहचे भय सुज्ञानाचा प्रारंभ होय;
त्यांच्या नियमाचे पालन करणार्‍यांना उत्तम आकलन शक्ती प्राप्त होते.
याहवेहची सदासर्वकाळ स्तुती होवो.