स्तोत्र 113
याहवेहचे स्तवन करा.
 
हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा;
याहवेहच्या नावाची स्तुती करा.
याहवेहच्या नामाचे स्तवन होत राहो,
आता आणि सदासर्वकाळ.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत,
याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.
 
याहवेह सर्व राष्ट्रांहून उच्च आहेत;
त्यांचे गौरव गगनमंडळाहून उंच आहे.
आमचे परमेश्वर याहवेह, यांच्या समान कोण आहे,
जे सर्वोच्च स्थानी सिंहासनावर विराजमान असतात,
जे वरून ओणवून,
गगनमंडळ आणि पृथ्वीचे अवलोकन करतात?
 
ते दीनांस धुळीतून वर काढतात,
आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात;
ते त्यांना राजपुत्रांबरोबर,
आपल्या प्रजेच्या प्रधानांसह बसवितात.
ते निपुत्रिक गृहिणीला तिच्या घरात स्थिरावतात,
आणि तिला मुले देऊन आनंदी माता बनवितात.
 
याहवेहचे स्तवन करा.