स्तोत्र 139
संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. 
  1 याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि  
मला ओळखले आहे.   
 2 माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता;  
दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.   
 3 माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात;  
माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे.   
 4 हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच,  
ते सर्व तुम्हाला माहीत असतात.   
 5 तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता;  
तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे.   
 6 हे ज्ञान इतके भव्य व अद्भुत आहे,  
की इतक्या उदात्ततेपर्यंत पोहोचणे मला अशक्य आहे.   
 7 तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ?  
तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू?   
 8 मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात;  
अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच.   
 9 मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन  
अत्यंत दूरच्या महासागरापलिकडे वस्ती केली,   
 10 तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील;  
तुमचा उजवा हात मला आधार देईल.   
 11 मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल,  
आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,”   
 12 अंधकार देखील तुमच्यापुढे अंधकार नाही, कारण तुमच्यापुढे रात्र  
दिवसासारखीच प्रकाशमान आहे;  
कारण अंधकार हा तुम्हाला प्रकाशासमान आहे.   
 13 माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे;  
माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.   
 14 मी तुमची स्तुती करतो,  
कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे;  
तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे,  
हे मी पूर्णपणे जाणतो.   
 15 गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना,  
जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता,  
जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती.   
 16 तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले;  
माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी माझ्या  
आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची तुम्ही लेखी नोंद केली.   
 17 हे परमेश्वरा, माझ्याबद्दलचे तुमचे विचार किती मौल्यवान आहेत!  
अबब, किती अगणित आहेत ते!   
 18 जर मी त्याची गणती केली,  
तर ती वाळूच्या कणापेक्षाही अधिक होईल—  
मी सकाळी जागा होतो, तेव्हाही मी तुमच्या समक्षतेत असतो.   
 19 हे परमेश्वरा, दुष्ट लोकांचा तुम्ही नायनाट केला तर किती बरे होईल!  
अहो रक्तपिपासू लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा!   
 20 ते तुमच्याविरुद्ध दुष्टपणाच्या गोष्टींची योजना करतात;  
तुमचे शत्रू तुमच्या नामाचा गैरवापर करतात.   
 21 याहवेह, तुमचा द्वेष करणार्यांचा मीही द्वेष करू नये काय  
आणि तुमच्याशी बंडखोरी करणार्यांचा मी तिरस्कार करू नये काय?   
 22 मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो;  
मी त्यांना माझे शत्रू मानतो.   
 23 हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा;  
माझे चिंताग्रस्त विचार बारकाईने तपासून पाहा.   
 24 बघा की एखादी वाईट प्रवृत्ती तर माझ्यात नाही,  
आणि मग मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने घेऊन जा.