स्तोत्र 145
एक स्तवनगीत. दावीदाची रचना. 
  1 हे माझ्या परमेश्वरा, माझ्या राजा, मी तुमचे स्तवन करेन;  
तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.   
 2 प्रतिदिनी मी तुमचे स्तवन करेन  
आणि तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.   
 3 याहवेह महान आहेत व परमस्तुत्य आहेत;  
त्यांची थोरवी अगाध आहे.   
 4 तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्या पिढीस विदित करते;  
ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात.   
 5 ते तुमच्या गौरवी प्रभुसत्तेची महती सांगतात—  
आणि मी तुमच्या अद्भुत कार्यांचे मनन करेन.   
 6 ते तुमच्या भयावह चमत्कारांची प्रशंसा करतील—  
मी तुमच्या थोरवीची घोषणा करेन.   
 7 ते तुमचा विपुल चांगुलपणा साजरा करतील,  
आणि आनंदाने तुमच्या नीतिमत्वाचे गुणगान गातील.   
 8 याहवेह करुणामय व कृपावान आहेत,  
ते मंदक्रोध व प्रीतीने ओतप्रोत भरलेले आहेत.   
 9 याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात;  
त्यांची करुणा त्यांच्या सर्व निर्मितीवर स्थिर असते.   
 10 याहवेह तुमची निर्मिती तुमची उपकारस्तुती करेल,  
आणि तुमचे संतजन तुम्हाला धन्य म्हणतील.   
 11 ते तुमच्या साम्राज्याच्या भव्यतेचे वर्णन  
आणि तुमच्या सामर्थ्याची उद्घोषणा करतील.   
 12 जेणेकरून तुम्ही केलेली अद्भुत कृत्ये  
आणि तुमच्या अप्रतिम राजवैभवाबद्दल सर्व मानवजातीस ज्ञान होईल.   
 13 कारण तुमचे राज्य अनंतकाळचे राज्य आहे,  
तुमची सत्ता पिढ्यान् पिढ्या चालते.  
याहवेह आपल्या सर्व प्रतिज्ञांशी एकनिष्ठ आहेत,  
त्यांच्या सर्व कार्यात ते विश्वासू असतात.   
 14 याहवेह सर्व पतन पावलेल्यांस उचलून घेतात  
व ओझ्याखाली वाकलेल्यास आधार देऊन उभे करतात.   
 15 सर्वांची दृष्टी तुमच्याकडे लागलेली असते  
आणि प्रत्येकास योग्य वेळेवर तुम्ही अन्य पुरवठा करता.   
 16 तुम्ही आपला हात उघडता  
आणि प्रत्येक जीवित प्राण्यांची सर्व इच्छा पूर्ण करता.   
 17 याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे  
आणि ते आपल्या सर्व कृत्यात विश्वासू आहेत.   
 18 जे त्यांचा धावा करतात,  
जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.   
 19 त्यांचे भय बाळगणार्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात;  
त्यांचा धावा ते ऐकतात आणि त्यांना संकटमुक्त करतात:   
 20 जे त्यांच्यावर प्रीती करतात, याहवेह त्या सर्वांचे रक्षण करतात,  
परंतु ते सर्व दुष्टांचा नायनाट करतील.   
 21 माझे मुख याहवेहची उपकारस्तुती करेल.  
प्रत्येक प्राणिमात्र त्यांच्या पवित्र नावाचे  
युगानुयुग गौरव करोत.