स्तोत्र 147
याहवेहचे स्तवन करा.
 
परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाणे किती मनोरम,
किती यथार्थ आहे!
 
यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे;
इस्राएलाच्या निर्वासितांचे तिथे पुनर्वसन करत आहेत.
भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात,
आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात.
ते तार्‍यांची गणती करतात
आणि त्यांनी प्रत्येकास नाव दिलेले आहे.
ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे;
त्यांची बुद्धी अपरिमित आहे.
याहवेह नम्रजनांस आधार देतात,
परंतु दुर्जनास बहिष्कृत करतात.
 
याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा;
वीणेच्या साथीवर आमच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा.
 
ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात;
पावसाच्या सरी भूमीवर पाठवितात
आणि डोंगरावर हिरवे गवत रुजवितात.
ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात
व हाक मारणार्‍या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात.
 
10 घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही,
मानवाचे सामर्थ्यवान पायही त्यांना संतुष्ट करीत नाही.
11 याहवेह त्यांचे भय बाळगणार्‍यांवर संतुष्ट असतात,
तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात.
 
12 यरुशलेम, याहवेहचा महिमा कर;
सीयोने, आपल्या परमेश्वराची स्तुती कर.
 
13 कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत
आणि त्या नगरातील तुझ्या लोकांस आशीर्वाद दिला आहे.
14 ते तुझ्या सर्व सीमांत शांतता प्रस्थापित करतात;
ते उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतात.
 
15 ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात;
त्यांचा शब्द वायुवेगाने पसरतो.
16 शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात
आणि हिमकण जमिनीवर राखेसारखे विखुरतात.
17 ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात.
त्यांच्या गोठविणार्‍या थंडीपुढे कोण टिकेल?
18 परंतु नंतर ते उष्ण हवेला आज्ञा करतात,
तेव्हा हिम वितळते आणि जलप्रवाह वाहू लागतो.
 
19 त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत
आणि विधी व नियम इस्राएलला स्पष्ट केले आहेत.
20 इतर कोणत्याही राष्ट्राकरिता त्यांनी असे केले नाही;
ते त्यांच्या आज्ञांबाबत अज्ञानी आहेत.
 
याहवेहचे स्तवन करा.