7
एक लाख चव्वेचाळीस हजारांवर शिक्कामोर्तब 
  1 त्यानंतर पृथ्वीच्या चारही कोपर्यांवर चार देवदूत उभे राहिलेले मी पाहिले. पृथ्वीवरील भूमी, समुद्र किंवा कोणताही वृक्ष, यावर वाहू नये म्हणून ते त्या चारही वार्यांना थोपवून धरीत होते.   2 मग दुसरा देवदूत पूर्वेच्या दिशेने हातात जिवंत परमेश्वराचा शिक्का घेऊन येताना मी पाहिला. पृथ्वीला व समुद्राला इजा करण्याचे काम ज्या चार देवदूतांवर सोपविले होते, त्या चार देवदूतांना तो ओरडून म्हणाला,   3 “आम्ही परमेश्वराच्या सेवकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का मारीपर्यंत पृथ्वी, समुद्र किंवा वृक्ष यांना काहीही इजा करू नका.”   4 ज्या लोकांवर हा शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली: ते इस्राएलच्या सर्व बारा वंशांमधून 1,44,000 लोक होते.   
 5 यहूदाह वंशातून 12,000;  
रऊबेन वंशातून 12,000;  
गाद वंशातून 12,000;   
 6 आशेर वंशातून 12,000;  
नफताली वंशातून 12,000;  
मनश्शेह वंशातून 12,000;   
 7 शिमोन वंशातून 12,000;  
लेवी वंशातून 12,000;  
इस्साखार वंशातून 12,000;   
 8 जबुलून वंशातून 12,000;  
योसेफ वंशातून 12,000;  
बन्यामीन वंशातून 12,000.   
शुभ्र वस्त्र परिधान केलेला प्रचंड समुदाय 
  9 यानंतर मी पाहिले आणि सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यातील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते.   10 ते प्रचंड आवाजात घोषणा करीत होते:  
“राजासनावर बसलेल्या  
आमच्या परमेश्वरापासून आणि  
कोकर्यापासून तारणप्राप्ती होत आहे.”   
 11 तेव्हा सर्व देवदूत राजासन व वडीलजन आणि चार सजीव प्राणी यांच्याभोवती उभे होते आणि राजासनासमोर दंडवत घालून उपासना करीत असताना   12 ते म्हणाले:  
“आमेन!  
आमच्या परमेश्वराला  
धन्यवाद, गौरव, सुज्ञता,  
उपकारस्तुती, मान, सामर्थ्य  
आणि पराक्रम सदासर्वकाळ असो.  
आमेन!”   
 13 मग या चोवीस वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “हे शुभ्र पोशाख घातलेले कोण आहेत व ते कुठून आले आहेत?”   
 14 मी म्हटले, “महाराज, ते तुम्हाला माहीत आहे.”  
तेव्हा ते म्हणाले, “जे महान संकटातून निभावून येतात, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकर्याच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत.   15 म्हणूनच,  
“आज ते येथे परमेश्वराच्या राजासनासमोर,  
त्यांच्या मंदिरात, त्यांची अहोरात्र सेवा करीत आहेत. जे राजासनावर बसलेले आहेत,  
ते त्यांच्या सानिध्यात  
त्यांना आश्रय देतील.   
 16 त्यांना पुन्हा कधी भूक,  
किंवा तहान लागणार नाही;  
त्यांना सूर्याचा ताप,*यश 49:10  
किंवा दाहक उष्णता बाधणार नाही.   
 17 कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा  
त्यांचा मेंढपाळ होईल,  
‘ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्याजवळ नेईल,’  
‘आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकतील.’†यश 25:8”