12
स्त्री व अजगर
1 मग स्वर्गामध्ये एक अलौकिक चिन्ह मला दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. तिच्या पायाखाली चंद्र होता. तिच्या डोक्यावर बारा तार्यांचा मुकुट होता. 2 ती गर्भवती होती आणि प्रसूतीची वाट पाहत प्रसूती वेदनांनी ओरडत होती. 3 तोच स्वर्गामध्ये दुसरे चिन्ह दिसले: एकाएकी सात डोकी आणि दहा शिंगे असलेला एक प्रचंड अग्निवर्ण अजगर दृश्यमान झाला. त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. 4 त्याने आपल्या शेपटाने एकतृतीयांश तारे ओढून घेतले आणि त्यांना पृथ्वीवर खाली लोटून दिले. मग तो अजगर, त्या स्त्रीचे मूल जन्मल्या बरोबर ते खाऊन टाकावे, या उद्देशाने तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. 5 त्या स्त्रीने एका अशा मुलाला जन्म दिला, “की जो सर्व राष्ट्रांवर लोह-राजदंडाने राज्य करणार होता.”*स्तोत्र 2:9 त्या मुलाला परमेश्वरापुढे व राजासनापुढे उचलून नेण्यात आले. 6 ती स्त्री अरण्यात पळून गेली. तिथे तिचे 1,260 दिवस पोषण करण्याकरिता परमेश्वराने तिच्यासाठी एक जागा तयार करून ठेवली होती.
7 मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराविरूद्ध लढले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याच्या दूतांनी युद्ध केले. 8 पुरेसे सामर्थ्य नसल्यामुळे युद्धात त्यांचा पराजय झाला आणि ते स्वर्गातील त्यांचे स्थान हरवून बसले. 9 तो प्रचंड अजगर, म्हणजे दियाबल किंवा सैतान म्हटलेला, सर्व जगाला फसविणारा प्राचीन सर्प, याला त्याच्या सर्व दूतांसह पृथ्वीवर लोटून देण्यात आले.
10 तेव्हा स्वर्गातून आलेली एक उच्च स्वरातील वाणी मी ऐकली. ती म्हणाली,
“परमेश्वराचे तारण, सामर्थ्य
व त्यांचे राज्य
आणि त्यांच्या ख्रिस्ताचा अधिकार यांचा उदय झाला आहे;
कारण आमच्या बंधुजनावर
आरोप ठेवणार्याला स्वर्गातून पृथ्वीवर ढकलून दिले आहे.
तो रात्रंदिवस आमच्या परमेश्वरासमोर त्यांच्यावर दोषारोप करीत असे!
11 पण आमच्या बंधुजनांनी कोकराच्या रक्ताने
आणि आपल्या साक्षीच्या वचनाने
त्याचा पाडाव केला.
स्वतःच्या जिवावर प्रेम न
करता त्यांनी मरण सोसले.
12 म्हणून अहो स्वर्गांनो व स्वर्गातील नागरिकांनो,
उल्लास करा!
पण पृथ्वी व समुद्रा तुम्हाला हाय, हाय!
कारण आता आपल्यासाठी अगदीच थोडका काळ बाकी आहे,
हे ओळखून सैतान अतिशय क्रोधाविष्ट
होऊन तुमच्याकडे आला आहे.”
13 आपल्याला पृथ्वीवर लोटून दिले आहे हे अजगराच्या लक्षात आले, तेव्हा जिने पुरुष संतानाला जन्म दिला होता, त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला. 14 पण तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या जागी तिने उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाच्या पंखांसारखे दोन पंख देण्यात आले. तिथे तिचे साडेतीन वर्षे पोषण व त्या अजगरापासून रक्षण व्हावयाचे होते. 15 तेव्हा त्या स्त्रीचा नायनाट करण्यासाठी त्या सर्पाच्या तोंडातून नदीच्या पाण्यासारखा एक महापूर बाहेर आला व तिच्या रोखाने जोरात वाहत गेला. 16 पण तेवढ्यात पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि तो महापूर गिळून घेऊन अजगरापासून त्या स्त्रीचा बचाव केला. 17 तेव्हा संतापलेला अजगर त्या स्त्रीच्या इतर मुलांना, म्हणजे जी सर्व मुले परमेश्वराच्या आज्ञा पाळीत आणि आपण येशूंचे आहोत अशी साक्ष देत असत, त्यांच्यावर हल्ला करण्यास सिद्ध झाला.