14
कोकरा आणि 1,44,000
नंतर सीयोन पर्वतावर एक कोकरा उभा असलेला मी पाहिला. ज्यांच्या कपाळावर त्यांचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिले होते, असे 1,44,000 लोक त्याच्याबरोबर होते. मग मी स्वर्गातून तो मोठ्या धबधब्याच्या गर्जनेसारखा आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा एक ध्वनी ऐकला. तो अनेक वीणावादक आपआपल्या वीणा वाजवित असल्यासारखा होता. लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्‍या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते. कारण त्यांनी स्वतःला शुद्ध राखलेले आहे आणि स्त्रीसंगाने ते मलीन झालेले नाहीत. जिथे कुठे कोकरा जातो, तिथे ते त्याच्यामागे जातात. त्यांना माणसातून विकत घेण्यात आले होते आणि परमेश्वराला व कोकर्‍याला प्रथमफळ म्हणून अर्पण केले होते. असत्य भाषण कधीही त्यांच्या मुखातून निघाले नाही; ते निष्कलंक आहेत.
तीन स्वर्गदूत
नंतर मी अंतराळाच्या मध्यभागी दुसरा एक देवदूत उडतांना पाहिला. पृथ्वीवर राहणार्‍या सर्वांना, म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोकांना सांगण्यासाठी तो सर्वकालची शुभवार्ता घेऊन चालला होता. तो मोठ्या आवाजात म्हणाला, “परमेश्वराचे भय धरा व त्यांना गौरव द्या! कारण त्यांनी न्यायनिवाडा करावा अशी वेळ आता आली आहे. ज्यांनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाण्याचे झरे निर्माण केले, त्यांची उपासना करा.”
तेव्हा त्याच्या पाठोपाठ दुसरा एक देवदूत आला. तो म्हणत होता, “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’*यश 21:9 ज्या शहराने सर्व राष्ट्रांना आपल्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य पाजले, ते पडले.”
मग त्यांच्यामागून एक तिसरा देवदूत मोठ्याने घोषणा करीत आला: “समुद्रातील पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला जो कोणी नमन करेल आणि त्याचे चिन्ह आपल्या कपाळावर किंवा हातावर गोंदून घेईल, 10 त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या क्रोधाचा द्राक्षमद्याचा प्याला, त्याची तीव्रता कमी न करता प्यावा लागेल. पवित्र देवदूत व कोकरा यांच्यासमक्ष या सर्वांचा जळत्या गंधकाने छळ करण्यात येईल. 11 त्यांच्या छळाचा धूर युगानुयुग वर चढत राहील आणि त्यातून त्यांची रात्री किंवा दिवसा कधीच सुटका होत नाही. कारण त्यांनी त्या पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला नमन केले, आणि त्याच्या नावाची सांकेतिक खूण गोंदून घेतली. 12 कारण येशूंवर विश्वास ठेवणारे व अखेरपर्यंत परमेश्वराच्या आज्ञा पाळणार्‍या पवित्र लोकांना यामुळे धीराने प्रत्येक छळ सहन करण्याची आता आवश्यकता आहे.”
13 मग मला आकाशातून एक वाणी ऐकू आली. ती मला म्हणाली “हे लिही: आतापासून प्रभूमध्ये मृत झालेले ते धन्य.”
आत्मा म्हणतो, “होय, कारण आता सर्व श्रमापासून त्यांना विश्रांती मिळेल. त्यांची सत्कृत्ये त्यांच्या मागोमाग जातील.”
पृथ्वीवर कापणी आणि द्राक्षकुंड तुडविणे
14 मग मी पाहिले तो मला एक पांढरा मेघ दिसला, त्या मेघावर मनुष्याच्या पुत्रासारखे कोणी एक बसले होते. त्यांच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व हातात धारदार विळा होता. 15 मग मंदिरातून एक देवदूत बाहेर आला व मेघावर बसलेल्यास उच्चस्वराने हाक मारून म्हणाला, “तुमचा विळा घ्या आणि कापणीस प्रारंभ करा, कारण पृथ्वीचे पीक तयार झाले आहे व कापणी करण्याची वेळ आली आहे.” 16 तेव्हा मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली.
17 यानंतर स्वर्गातील मंदिरातून आणखी एक देवदूत निघाला आणि त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. 18 दुसरा एक देवदूत ज्याला अग्नीवर अधिकार होता तो वेदीतून बाहेर आला आणि विळा घेतलेल्या देवदूताला मोठ्याने म्हणाला, “पृथ्वीवरील द्राक्षवेलींना लागलेले द्राक्षांचे घोस, विळा चालवून कापून घे. कारण ते पिकले आहेत.” 19 तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर आपला विळा चालविला आणि द्राक्षे गोळा करून, रस काढण्यासाठी ती परमेश्वराच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकली. 20 ते द्राक्षकुंड शहराबाहेर तुडविण्यात आले, तेव्हा त्यातून रक्ताचा पाट वाहिला. हा पाट घोड्यांच्या लगामा एवढा उंच आणि तीनशे किलोमीटर लांब होता.

*14:8 यश 21:9