2
परमेश्वराचा नीतिपर न्यायनिवाडा 
  1 जे तुम्ही दुसर्यांना दोष लावता, एखाद्या विषयाला धरून दुसर्यांचा न्याय करता, त्यावेळी तुम्ही स्वतः दोषी ठरता; कारण तुम्ही जे न्याय करणारे आहात, ते स्वतःच त्या गोष्टी करता. यामुळे, तुम्हाला कोणतीच सबब सांगता येणार नाही.   2 आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे.   3 तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का?   4 त्यांचा विपुल दयाळूपणा, धीर आणि सहनशीलता यांचा अवमान करून परमेश्वराची दया तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे तुला समजत नाही का?   
 5 तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.   6 परमेश्वर “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे योग्य ते प्रतिफळ देतील.”*स्तोत्र 62:12; नीती 24:12   7 जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील.   8 पण जे स्वार्थी आणि सत्याचा नकार करणारे आणि दुष्ट मार्गांनी चालतात, त्यांच्यावर कोप व क्रोध राहील.   9 वाईट करणार्या प्रत्येक मनुष्यावर; प्रथम यहूदीयावर आणि मग गैरयहूदीयांवर क्लेश आणि संकटे येतील.   10 परंतु सर्व चांगले काम करणार्यांना; प्रथम यहूदी, नंतर गैरयहूदीयांना परमेश्वराकडून गौरव, सन्मान व शांती ही लाभतील.   11 कारण परमेश्वर पक्षपात करीत नाहीत.   
 12 नियमशास्त्राशिवाय ज्या सर्वांनी पाप केले त्यांचा नाश नियमशास्त्राशिवाय होईल, आणि ज्यांनी नियमशास्त्राधीन असून पाप केले असेल त्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार केला जाईल.   13 नियमशास्त्र केवळ ऐकणारे परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान ठरत नाहीत, परंतु जे नियमशास्त्र पाळणारे आहेत, त्यांना नीतिमान म्हणून घोषित केले जाईल.   14 निश्चितच, जेव्हा गैरयहूदी लोकांजवळ नियमशास्त्र नव्हते, तरी जे नियमशास्त्रात आहे ते नैसर्गिकरित्या पाळीत होते, त्यांच्याजवळ नियम नव्हते तरी ते स्वतः नियम असे झाले.   15 ते प्रदर्शित करतात की नियम त्यांच्या अंतःकरणात लिहिलेले आहे; त्यांची विवेकबुद्धीच त्यांना साक्ष देते आणि त्यांचेच विचार त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवितात.   16 हे त्या दिवशी घडेल जेव्हा माझ्या शुभवार्तेनुसार परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे प्रत्येकाच्या गुप्त रहस्यांचा न्याय करतील.   
यहूदी आणि नियमशास्त्र 
  17 आता, जर तुम्ही स्वतःला यहूदी समजता व नियमशास्त्रावर अवलंबून राहता आणि परमेश्वरामध्ये प्रौढी मिरवता;   18 तुम्हाला परमेश्वराच्या नियमांचे शिक्षण मिळाले आहे, म्हणून तुम्ही त्यांची इच्छा ओळखता आणि श्रेष्ठ ते पसंत करता;   19 तुम्हाला खात्री आहे की, तुम्ही एखाद्या आंधळ्याला मार्गदर्शक व्हाल व अंधारात इतरांना प्रकाश असे व्हाल.   20 नियमांचे दृश्य स्वरूप ज्ञान व सत्य यामध्ये आहे, आणि म्हणून आपण मूर्खाचे मार्गदर्शक, लहान मुलांचे शिक्षक आहोत असे तुम्हाला वाटते.   21 जे तुम्ही, इतरांना शिकविणारे, ते तुम्ही स्वतःला का शिकवीत नाही? चोरी करू नका म्हणून संदेश सांगणारे, तुम्ही चोरी का करता?   22 जे तुम्ही लोकांनी व्यभिचार करू नये, असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार करता का? जे तुम्ही मूर्तीचा विटाळ मानणारे, तुम्ही मंदिर का लुटता?   23 जे तुम्ही नियमशास्त्राचा गर्व असणारे, ते तुम्ही नियम मोडून परमेश्वराचा अपमान का करता?   24 मग नियमशास्त्र म्हणते: “तुमच्यामुळेच गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे.”†यश 52:5; यहे 36:20, 22   
 25 नियम पाळत असाल तर सुंतेला काही मोल आहे; पण तुम्ही नियम पाळीत नसाल, तर सुंता न झाल्यासारखे आहात.   26 जर ज्यांची सुंता झाली नाही ते नियमशास्त्राचे पालन करतात, तर त्यांची सुंता न होणे, हे सुंता झाल्यासारखे होणार नाही काय?   27 ज्यांच्या शरीराची सुंता झालेली नसून नियम पाळतात ते तुम्हाला दोषी ठरवतील, कारण तुमच्याजवळ लेखी नियम आहेत आणि सुंता झालेली असतानाही तुम्ही नियम तोडता.   
 28 कारण केवळ बाह्य स्वरूपाने कोणी यहूदी होत नाही, सुंता ही केवळ शारीरिक आणि बाह्य नाही.   29 तोच खरा यहूदी, जो मनाने यहूदी आहे आणि सुंता ही अंतःकरणाची सुंता आहे व ती आत्म्याद्वारे आहे, लेखी व्यवस्थेप्रमाणे नाही. अशा व्यक्तीची प्रशंसा इतर लोकांकडून नव्हे, तर परमेश्वरापासून होईल.