6
पापाला मेलेले आणि ख्रिस्तामध्ये जिवंत
1 तर मग आपण काय म्हणावे? आपल्याला अधिक कृपा मिळावी म्हणून आपण पाप करीतच राहावे काय? 2 नक्कीच नाही! जे आपण पापाला मरण पावलो आहोत, ते आपण त्यात कसे जगू शकतो? 3 ज्या आपण सर्वांनी ख्रिस्त येशूंमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्यांच्या मृत्यूमध्येही बाप्तिस्मा घेतला हे तुम्हाला माहीत नाही का? 4 यास्तव बाप्तिस्म्याद्वारे मरणाने आपण ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी शक्तीने मरणातून उठविले गेले, त्याचप्रमाणे आपणही पूर्णतः नवीन जीवन जगावे.
5 जर आपण त्यांच्या मरणामध्ये त्यांच्याशी अशा रीतीने संयुक्त झालो, तर त्यांच्या पुनरुत्थानामध्येही त्यांच्याशी खात्रीने संयुक्त होऊ. 6 आपल्याला माहीत आहे की आपला जुना स्वभाव त्यांच्याबरोबरच खिळला गेला व पापाच्या अधिकारात असलेले आपले शरीर निर्बल झाले म्हणून यापुढे आपण पापाचे गुलाम असू नये. 7 कारण जो कोणी मरण पावला आहे, तो पापापासून मुक्त झाला आहे.
8 आता जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो, तर त्यांच्याबरोबर जिवंतही होऊ असा आपला विश्वास आहे. 9 कारण आपल्याला ठाऊक आहे की, ख्रिस्त मरणातून उठविले गेले ते पुन्हा मरू शकत नाहीत; यापुढे त्यांच्यावर मरणाची सत्ता चालणार नाही. 10 त्यांचे हे मरण पापासाठी एकदाच होते; पण आता जे जीवन ते जगतात, ते परमेश्वराकरिता जगतात.
11 याप्रमाणे, आपण पापाला मरण पावलेले आणि ख्रिस्त येशूंद्वारे परमेश्वरासाठी जिवंत झालेले असे माना. 12 तुम्ही वाईट वासनांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून तुमच्या मर्त्य शरीरावर पापाची सत्ता गाजवू देऊ नका. 13 तुमच्या शरीराचा कोणताही अवयव पाप करण्यासाठी दुष्टपणाचे साधन म्हणून सादर करू नका, परंतु त्याऐवजी मरणातून जिवंत झाल्यासारखे परमेश्वराला सादर करा; आणि आपला प्रत्येक अवयव नीतिमत्वाची साधने होण्याकरिता त्याला सादर करा. 14 तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून येथून पुढे पाप तुम्हावर स्वामित्व चालविणार नाही.
नीतिमत्वाचे दास
15 तर मग काय? आपण नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेच्या अधीन आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? नक्कीच नाही! 16 ज्याची आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही स्वतःला वाहवून घेता, त्याची आज्ञा पाळण्याने तुम्ही त्याचे गुलाम बनता; पापाची गुलामी तर मरण किंवा परमेश्वराचे आज्ञापालन तर नीतिमत्व हे तुम्हाला माहीत नाही काय? 17 परमेश्वराचे आभारी आहोत, कारण पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, परंतु आता तुम्हाला जी शिकवण दिली आहे तिचे तुम्ही अंतःकरणापासून आज्ञापालन केले आणि तुम्ही समर्पित आहात. 18 तुम्ही पापापासून मुक्त होऊन आता नीतिमत्वाचे दास झाला आहात.
19 तुमच्या मानवी रीतीप्रमाणे रोजच्या जीवनातील उदाहरण घेऊन मी बोलतो. तुम्ही आपले अवयव अशुद्धपणाला व सतत वाढणार्या दुष्टपणाला दास म्हणून समर्पित केले होते, तसे आता स्वतःस जे नीतिमत्व पावित्र्याकडे नेते त्यास दास म्हणून समर्पित करा. 20 जेव्हा तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा नीतिमत्वाच्या बंधनातून मुक्त होता. 21 ज्यासाठी तुम्हाला आता लाज वाटते त्या गोष्टींपासून त्यावेळी तुम्हाला काय लाभ मिळाला? त्या गोष्टींचा परिणाम तर मरण आहे. 22 पण आता तुम्ही पापाच्या सत्तेपासून मुक्त झाला असून परमेश्वराचे दास झाला आहात, आणि जो लाभ तुम्हाला मिळाला आहे तो पावित्र्याकडे नेतो व त्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे. 23 कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.