12
जिवंत यज्ञ
यास्तव, बंधू आणि भगिनींनो, मी परमेश्वराच्या दयेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व परमेश्वराला संतोष होईल असा यज्ञ करावा; हीच तुमची खरी आणि योग्य उपासना ठरेल. या जगाशी समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे.
ख्रिस्ताच्या मंडळीत विनम्र सेवा
मला दिलेल्या कृपेने मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो: स्वतःला वाजवीपेक्षा अधिक समजू नका, तर आपणास परमेश्वराने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने स्वतःला माना. आपल्या प्रत्येकाला एक शरीर असून अनेक अवयव आहेत, आणि हे सर्व अवयव एकच कार्य करीत नाहीत. आपण ख्रिस्तामध्ये अनेक असलो, तरी एक शरीर आहोत व आपण सर्व एकमेकांचे अवयव आहोत. आपल्या सर्वांना जी कृपा दिली आहे, त्यानुसार आपल्याला वेगवेगळी दाने दिली आहेत. जर तुम्हाला परमेश्वराचे संदेश सांगण्याचे कृपादान असेल, तर तो संदेश आपल्या विश्वासानुसार सांगा. जर सेवा करण्याचे, तर सेवा करा. जर शिकविण्याचे, तर शिकवा. जर उत्तेजनाचे, तर उत्तेजन द्या; जर देण्याचे असेल, तर औदार्याने द्या; जर व्यवस्थापनाचे*किंवा इतरांना पुरवठा करणे असेल, तर आस्थेने करा; जर करुणा करण्याचे, तर उल्हासाने करा.
कृतीद्वारे प्रीती
प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा. 10 एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा. 11 आस्थेमध्ये कमी पडू नका, तर आपला आध्यात्मिक आवेश कायम राखा व प्रभूची सेवा करा. 12 आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा. 13 जे गरजवंत असे प्रभूचे लोक आहेत, त्यांना द्या. आदरातिथ्य करा.
14 जे तुमचा छळ करतात; त्यांना शाप देऊ नका; उलट आशीर्वाद द्या. 15 आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा; रडणार्‍यांबरोबर रडा. 16 एकमेकांशी ऐक्याने राहा. गर्विष्ठ होऊ नका. तर अगदी सामान्य लोकांच्या सहवासात आनंद माना,किंवा कमी दर्जाचे काम करण्यास तयार असणे अहंकार बाळगू नका.
17 वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा. 18 साधेल तर, तुम्हाकडून होईल तितके प्रत्येकाशी शांतीने राहा. 19 माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,”अनु 32:35 असे प्रभू म्हणतात. 20 त्याउलट:
“तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या;
तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या.
असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल.”§नीती 25:21, 22
21 वाईटाने जिंकले जाऊ नका, तर चांगल्याने वाईटाला जिंका.

*12:8 किंवा इतरांना पुरवठा करणे

12:16 किंवा कमी दर्जाचे काम करण्यास तयार असणे

12:19 अनु 32:35

§12:20 नीती 25:21, 22