7
1 हे राजकन्ये,
पायतणे घातलेले तुझे पाय किती सुंदर दिसतात!
कुशल कारागिराने घडविलेल्या रत्नाप्रमाणे
तुझ्या मांड्या वळणदार आहेत.
2 तुझी नाभी गोलाकार पेल्यासारखी असून,
त्यात मसालेदार मद्याची कधीच वाण पडत नाही,
तुझी कंबर कमळिनीपुष्पांनी वेढलेल्या
गव्हाच्या राशीसारखे आहे.
3 तुझे स्तन दोन हरिणींसारखे आहेत,
जुळ्या मृगांसारखे ते मनोरम आहेत.
4 हस्तिदंती मनोर्यासारखी तुझी मान आहे.
तुझे नयन बाथ-रब्बीमच्या वेशीकडे असलेल्या
हेशबोनाच्या तळ्यासारखे आहे.
तुझे नाक जणू काही लबानोन येथील,
जे दिमिष्कच्या दिशेला असलेल्या बुरुजासारखे रेखीव आहे.
5 तुझ्या मस्तकाने कर्मेल डोंगरासारखे तुला मुकुटमंडित केले आहे.
तुझे केस जांभळ्या रंगाच्या शाही पडद्यासारखे आहे;
या केशसंभारात राजा बंदिस्त झाला आहे.
6 माझ्या प्रिये, तू किती सुंदर आणि प्रसन्न करणारी आहेस,
तू अत्यंत मनमोहक आहेस!
7 तू खजुरीच्या झाडासारखी सडपातळ आहेस.
खजुरीच्या घोसासारखे तुझे स्तन आहेत.
8 मी म्हटले, मी खजुरीच्या झाडावर आरोहण करेन
आणि त्याच्या घोसांना धरीन;
तुझे स्तन द्राक्षवेलीमध्ये द्राक्षांच्या गुच्छासारखे होवोत,
आणि तुझा श्वास सफरचंदासारखा सुवासिक होवो,
9 तुझे मुख उत्तम द्राक्षारसासारखे होवो.
नायिका
द्राक्षारस ओठांवरून दातांना स्पर्श करून,
थेट माझ्या प्रिये कडे जावो,
10 मी माझ्या प्रियकराची आहे,
आणि तो माझीच कामना करतो.
11 माझ्या प्रिया, ये, चल, आपण रानावनात जाऊ,
गावामध्ये*किंवा मेहेंदीच्या झुडपांमध्ये रात्र घालवू.
12 सकाळीच उठून आपण द्राक्षमळ्यात जाऊ;
द्राक्षवेली मोहरल्या आहेत की काय,
त्यांना कळ्या आल्यात की काय ते पाहू.
डाळिंबाच्या झाडांना फुले आलीत काय ते पाहू.
आणि तिथे मी माझ्या प्रीतीचा वर्षाव करेन.
13 त्या ठिकाणी दुदाफळाचे सुगंध दरवळत असतात,
आणि दुर्मिळ फळे आमच्या दाराशीच उपलब्ध होतात
नवीन आणि जुनीही फळे,
ही सर्व माझ्या प्रियकरासाठी राखून ठेवली आहेत.