3
सद्वर्तनासाठी तारण झालेले
आपल्या लोकांना आठवण करून दे की, सत्ता व अधिकारी यांच्या अधीन राहून आज्ञापालन करावे आणि चांगल्या कार्याकरिता नेहमी सिद्ध असावे, त्यांनी कोणाची निंदा करू नये व भांडण करू नये, तर सर्वांशी सौम्यतेने आणि आदराने वागावे.
पूर्वी आपण देखील मूर्ख व अवज्ञा करणारे; सर्वप्रकारे बहकलेले आणि विलासवृत्ती आणि दुष्ट वासनांचे गुलाम होतो. क्रोध व हेवा यांनी आपली जीविते भरून गेली हाती आणि एकमेकांचा द्वेष करणारे होतो. जेव्हा आपल्या तारणाऱ्या परमेश्वराची दया आणि प्रीती प्रकट होण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी आपले तारण केले, कारण हे आपण केलेल्या नीतिच्या कृत्यामुळे झाले नाही, तर ते त्यांच्या दयेने झाले आणि आपल्याला नवीन जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण दिले आहे. त्यांनी आपले तारणकर्ता येशू ख्रिस्ताद्वारे आपल्यावर विपुलतेने पवित्र आत्मा ओतला आहे, म्हणून त्यांच्या कृपेमुळे आपणास नीतिमान ठरविण्यात यावे आणि त्यांनी दिलेल्या सार्वकालिक जीवनाच्या आशेनुसार आपण वारस व्हावे. मी तुला सांगितलेल्या या सर्वगोष्टी सत्य आहेत आणि या गोष्टींवर विशेष भर देऊन तू त्या सांगाव्या अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी सत्कार्य करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी उत्कृष्ट असून प्रत्येकाला लाभदायक आहेत.
परंतु नियमशास्त्राबद्दल मूर्खवाद, वंशावळ्या व वादविवाद आणि भांडणे टाळा, कारण हे निरर्थक आणि निरुपयोगी आहे. 10 तुमच्यामध्ये कोणी तट पाडत असेल, तर त्याला पहिला व दुसरा इशारा दिला जावा, नंतर त्याच्याशी संबंध ठेवू नये. 11 असा मनुष्य बिघडलेला आहे आणि त्याने स्वतःला दोषी ठरविले असून तो पाप करतो, याची तू खात्री बाळग.
 
अखेरच्या सूचना
12 अर्तमाला किंवा तुखिकाला मी तुझ्याकडे पाठविल्यानंतर शक्य तितक्या लवकर तू मला निकोपोलीस येथे येऊन भेट, कारण मी हिवाळ्यात तिथेच राहण्याचा निश्चय केला आहे. 13 जेनस जो विधि-विशेषज्ञ व अपुल्लोस यांच्या प्रवासासाठी तुमच्याकडून शक्य होईल ती सर्व मदत करा आणि त्यांना लागणार्‍या गरजेच्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत याची काळजी घ्या.
 
14 कारण गरजवंतांना मदत करण्यास आपल्या लोकांनी शिकले पाहिजे, म्हणजे ते आपल्या दररोजच्या गरजा भागवू शकतील व निष्फळ जीवन जगणार नाही.
 
15 माझ्याबरोबर असलेला प्रत्येकजण तुला अभिवादन पाठवितो.
जे विश्वासात आमच्यावर प्रेम करतात त्यांना सलाम सांगा.
 
तुम्हा सर्वांवर कृपा असो.