2
मापनपट्टी घेतलेला मनुष्य
मग मी वर पाहिले, तेव्हा माझ्यासमोर हातात मापनपट्टी घेतलेला एक मनुष्य मला दिसला. मी त्याला विचारले, “तू कुठे जात आहेस?”
तो म्हणाला, “मी यरुशलेमेचे मोजमाप घेण्यासाठी चाललो आहे. ती किती लांब व किती रुंद आहे हे मला पाहावयाचे आहे.”
आणि पाहा, जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो जाऊ लागला, तेव्हा दुसरा एक स्वर्गदूत त्याला भेटण्यास आला. व त्याला म्हणाला: “पळत जा आणि त्या तरुणाला सांग, की यरुशलेम तटबंदी नसलेले नगर होईल कारण तिथे असंख्य लोक व जनावरे असतील. आणि मी स्वतः त्याभोवती अग्नीचा कोट होईन व आत त्या नगरीचे वैभव होईन,” असे याहवेह जाहीर करतात.
“चला! चला! उत्तरेकडील देशांमधून बाहेर पळा, कारण मी तुम्हाला स्वर्गातील वाऱ्याच्या चारही दिशांना विखुरले आहे,” असे याहवेह जाहीर करतात.
“चल सीयोने! जी तू बाबेल कन्येत राहते!” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात, “गौरवशाली प्रभूने तुम्हाला लूटणाऱ्या राष्ट्राविरुद्ध मला पाठविले—जो कोणी तुम्हाला स्पर्श करतो, तो याहवेहच्या डोळ्यातील बुबुळाला स्पर्श करतो— मी निश्चितच त्यांच्याविरुद्ध माझा हात उगारेन, म्हणजे त्यांचेच गुलाम त्यांची लुटालूट करतील.*किंवा मी त्यांना लूट असे देईन मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे.
10 “अगे सीयोनकन्ये, गीत गा आणि उल्हास कर! कारण मी येत आहे आणि मी तुम्हामध्ये वस्ती करेन,” याहवेह जाहीर करतात. 11 “त्या दिवसात अनेक राष्ट्रे याहवेहकडे वळतील. मी तुम्हामध्ये वस्ती करेन मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे. 12 आणि यहूदीया ही पवित्र भूमी याहवेहचे वतन होईल, आणि ते पुन्हा यरुशलेमला निवडतील. 13 हे सर्व मानवजाती, याहवेहपुढे स्तब्ध राहा, कारण ते आपल्या पवित्र निवासस्थानातून जागृत झाले आहेत.”

*2:9 किंवा मी त्यांना लूट असे देईन