4
सुवर्ण दीपवृक्ष व जैतुनाचे दोन वृक्ष
मग जो याहवेहचा स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, तो परत आला व त्याने मला जागे केले, जणू काय मी झोपेतच होतो. त्याने मला विचारले, “तुला आता काय दिसते?”
मी उत्तर दिले, “सात दिवे असलेला एक ठोस सोन्याचा दीपवृक्ष मला दिसत आहे. त्याच्या वरच्या टोकाला एक कटोरा असून, त्यात सात दिवे होते व त्याला लावलेल्या नळ्यांमधून त्या दिव्यांना तेल पुरविले जाई. या कटोर्‍याच्या उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक अशी दोन जैतुनाची झाडे मला दिसतात.”
तेव्हा जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, त्याला मी विचारले, “माझ्या प्रभू, हे काय आहे?”
त्यावर देवदूताने उत्तर दिले, “हे काय आहे तुला माहीत नाही काय?”
तेव्हा मी म्हणालो, “नाही, प्रभू.”
मग तो मला म्हणाला, “जरूब्बाबेलासाठी याहवेहचा हा संदेश आहे: ‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
“हे विशाल पर्वता, तू कोण आहेस? जरूब्बाबेलापुढे तू सपाट मैदान असा होशील. मग तो शिखरशिलेस बाहेर आणून प्रचंड गजर करेल, ‘याहवेह आशीर्वादित करो! याहवेह आशीर्वादित करो!’ ”
याहवेहकडून मला एक वचन मिळाले: “जरूब्बाबेलाच्या हस्ते या मंदिराचा पाया घातला; आणि तोच स्वहस्ते ते पूर्ण करेल. तेव्हा तुम्हाला समजेल की सर्वसमर्थ याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.
10 “ही सुरुवात अगदी लहान असली तरी तिला तुच्छ मानण्यास कोण धजावेल, कारण याहवेहचे सात नेत्र संपूर्ण पृथ्वीभर फिरतात व जरूब्बाबेलाच्या हातात शिखरशिला आहे, हे पाहून हर्षाने प्रफुल्लित होतात?”
11 मग मी त्या दूताला विचारले, “दीपवृक्षाच्या उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक अशी दोन जैतुनाची झाडे का आहेत?”
12 मी पुन्हा त्याला विचारले, “तसेच तेल ओतणार्‍या सोन्याच्या दोन नळ्यांजवळ दोन जैतुनाच्या फांद्या का आहेत?”
13 त्यावर त्याने मला विचारले, “तुला हे काय आहे ते माहीत नाही काय?”
मी म्हटले, “नाही, प्रभू.”
14 तेव्हा त्याने मला सांगितले, “अखिल पृथ्वीचे प्रभू आहेत, त्यांची सेवा करणारे हे दोन अभिषिक्त*किंवा तेल पुरविणारे आहेत.”

*4:14 किंवा तेल पुरविणारे