6
चार रथ
1 मग मी पुन्हा वर पाहिले, तो दोन पर्वतांमधून चार रथ येत असलेले मला दिसले. ते पर्वत कास्याचे होते. 2 पहिला रथ तांबडे घोडे ओढीत होते, दुसरा रथ काळे घोडे ओढीत होते, 3 तिसरा रथ पांढरे घोडे, तर चौथा रथ पंचरंगी घोडे ओढीत होते. 4 तेव्हा मी जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, त्याला विचारले, “प्रभू, हे काय आहेत?”
5 देवदूताने मला उत्तर दिले, “अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या समोर उभे राहणारे हे चार स्वर्गीय आत्मे*किंवा वारा आहेत, ते तिथून बाहेर जात आहेत. 6 काळ्या घोड्यांचा रथ उत्तरेला जाईल आणि पांढर्या घोड्यांचा रथ पश्चिमेकडे,†म्हणजेच त्यांच्या पाठीमागे पंचरंगी घोड्यांचा रथ दक्षिणेकडे जाईल.”
7 जेव्हा ते शक्तिशाली घोडे निघाले, ते संपूर्ण पृथ्वीवर जाण्यास आतुर झाले होते आणि तो त्यांना म्हणाला, “संपूर्ण पृथ्वीवर जा!” तेव्हा ते संपूर्ण पृथ्वीवर गेले.
8 मग त्याने मला बोलाविले आणि तो मला म्हणाला, “जे उत्तरेला गेले, त्यांनी उत्तरेकडील भूमीला माझ्या आत्म्याची शांती दिली आहे.”
यहोशुआसाठी मुकुट
9 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 10 “हेल्दय, तोबीयाह व यदायाह यांनी बाबेलमध्ये बंदिवासात असलेल्या यहूदी लोकांकडून आणलेले रुपे व सोने घे. त्याच दिवशी तू सफन्याहचा पुत्र योशीयाहच्या घरी जा. 11 रुपे व सोने घेऊन त्यांचा एक मुकुट तयार कर. मग तो मुकुट यहोसादाकाचा पुत्र, प्रमुख याजक यहोशुआच्या मस्तकावर ठेव. 12 त्याला सांग की सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हा तो पुरुष आहे, ज्याचे नाव “शाखा” आहे, जो त्याच्या ठिकाणापासून शाखा काढेल आणि याहवेहचे मंदिर बांधेल. 13 तो याहवेहचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली वस्त्र परिधान करेल आणि राजासनावर बसेल व राज्य करेल. तो त्याच्या सिंहासनावर याजक होईल आणि या दोघात समन्वय होईल.’ 14 हेलेम‡किंवा हेल्दय, तोबीयाह आणि यदायाह आणि सफन्याहचा पुत्र हेन§किंवा दयाळू, यांना याहवेहच्या मंदिराचे स्मृतिचिन्ह म्हणून मुकुट देण्यात येईल. 15 दूरवर असलेले लोकही येतील व याहवेहचे मंदिर बांधण्यासाठी मदत करतील, तेव्हा तुला कळेल की सर्वसमर्थ याहवेहनी मला तुझ्याकडे पाठवले आहे. तुझे परमेश्वर याहवेह त्यांच्या आज्ञा तू काळजीपूर्वक पाळशील तरच हे घडेल.”