11
 1 हे लबानोना, आपल्या वेशी उघड,  
म्हणजे अग्नी तुझ्या गंधसरूच्या वृक्षांना भस्म करेल!   
 2 अहो सनोवरच्या वृक्षांनो, गंधसरूच्या सर्व नष्ट झालेल्या वृक्षांसाठी आकांत करा;  
डौलदार वृक्ष उद्ध्वस्त झाले आहेत!  
बाशानातील एलावृक्षांनो, आकांत करा;  
घनदाट वने तोडून टाकली जात आहेत!   
 3 मेंढपाळांचा आकांत ऐका;  
त्यांची सुपीक कुरणे नष्ट झाली आहेत!  
सिंहाच्या गर्जना ऐका;  
यार्देनेच्या खोऱ्यातील गर्द झाडी उद्ध्वस्त झाली आहे.   
दोन मेंढपाळ 
  4 मग माझे परमेश्वर याहवेह असे म्हणाले: “कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा मेंढपाळ हो.   5 त्यांचे ग्राहक त्यांची कत्तल करतात आणि त्याबद्दल काहीही शिक्षा न होता निसटून जातात. जे त्यांना विकतात, ते म्हणतात, ‘याहवेहची उपकारस्तुती असो, मी श्रीमंत आहे!’ त्यांचे स्वतःचे मेंढपाळदेखील त्यांना दयामाया दाखवित नाहीत.   6 या देशातील लोकांची मी देखील गय करणार नाही,” असे याहवेह जाहीर करतात. “मी प्रत्येकाला त्यांच्या शेजाऱ्याच्या व त्यांच्या राजांच्या हाती देईन. ते देश उद्ध्वस्त करतील आणि मी त्यांच्यापासून कोणालाही सोडविणार नाही.”   
 7 तेव्हा मी कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा, विशेषतः कळपात अत्याचार होत असलेल्या मेंढरांचा मेंढपाळ झालो. मग मी मेंढपाळांच्या दोन काठ्या घेतल्या, एकीला मी कृपा व दुसरीला ऐक्य असे नाव दिले आणि मेंढरांचे राखण केले.   8 आणि एका महिन्यातच मी तीन मेंढपाळांना काढून टाकले.  
परंतु त्या मेंढरांना माझी घृणा आली, त्यामुळे मी त्रागलो,   9 आणि मी म्हणालो, “मी तुमचा मेंढपाळ राहणार नाही. जे मरत असतील, ते मरो आणि जे नाश होत असतील, ते नाश पावोत. जे उरलेले आहेत, ते एकमेकांचे मांस खावोत.”   
 10 मग मी कृपा नावाची माझी काठी घेतली आणि ती मोडली, सर्व राष्ट्रांशी मी केलेला करार रद्द केला.   11 त्या दिवशी तो करार रद्द झाला, आणि माझ्याकडे पाहणाऱ्या अत्याचार होत असलेल्या मेंढरांच्या कळपास कळले की हे याहवेहचे वचन होते.   
 12 मी म्हणालो, “तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला माझे वेतन द्या; पण तुम्हाला वाटत नसेल तर देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला चांदीची तीस नाणी दिली.   
 13 मग याहवेहने मला सांगितले, “ही नाणी कुंभारापुढे फेकून दे,” त्यांनी माझ्यासाठी किती भारी मोल ठरविले! मग मी ती चांदीची तीस नाणी घेतली व ती याहवेहच्या भवनातील कुंभारापुढे फेकली.   
 14 मग मी माझी ऐक्य नावाची दुसरी काठी मोडली, यहूदीया व इस्राएल यामधील कौटुंबिक ऐक्य भंग केले.   
 15 मग याहवेहने मला सांगितले, “परत जाऊन मूर्ख मेंढपाळाची अवजारे घे.   16 मी या राष्ट्रास एका अशा मेंढपाळाच्या हाती देईन, जो हरविलेल्या मेंढरांची काळजी घेणार नाही, कोकरांकडे लक्ष देणार नाही, जखमी मेंढरांना औषध देणार नाही किंवा सशक्त मेंढरांना चारा देणार नाही. त्याऐवजी तो पुष्ट मेंढरे खाऊन टाकील व त्यांची खुरे विदारून त्याचे तुकडे करेल.   
 17 “धिक्कार असो अशा कुचकामी मेंढपाळाला,  
जो कळपाला सोडून पळून जातो!  
तलवार त्याचा हात कापून व उजवा डोळा फोडून टाको!  
त्याचा हात पूर्णपणे निकामी होवो,  
आणि त्याचा उजवा डोळा पूर्णपणे अंध होवो!”