13
पापक्षालन 
  1 “त्या दिवशी दावीदाच्या घराण्यातून आणि यरुशलेममधील लोकांमधून एक झरा उगम पावेल, तो त्याच्या लोकांना सर्व पापांपासून आणि अशुद्धतेपासून शुद्ध करेल.   
 2 “त्या दिवशी, मी संपूर्ण देशातून मूर्तींच्या नावाचा समूळ उच्छेद करेन, ते त्यांच्या स्मरणातही राहणार नाही. सर्व खोट्या संदेष्ट्यांचा आणि अशुद्धतेच्या आत्म्याचा मी समूळ नाश करेन,” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.   3 “आणि जर कोणी पुन्हा खोटे भविष्यकथन करू लागला, ज्यांनी त्याला जन्म दिला ते त्याचे खुद्द आईवडीलच त्याला सांगतील, ‘तू मेलाच पाहिजे, कारण तू याहवेहच्या नावाने खोटे बोलत आहेस.’ ते भविष्यकथन करणाऱ्यास भोसकून जिवे मारतील!   
 4 “त्या दिवशी प्रत्येक खोटा संदेष्टा आपल्या भविष्यकथनाच्या दानाबद्दल लज्जित होईल. ते संदेष्ट्यांसाठी केसांनी बनविलेली विशिष्ट वस्त्रे घालणार नाहीत.   5 प्रत्येकजण म्हणेल, ‘मी संदेष्टा नाही; मी एक शेतकरी आहे; तारुण्यापासून भूमीची मशागत करणे माझ्या उपजीविकेचे साधन आहे.*किंवा एका शेतकरी मनुष्याने माझ्या तारुण्यात मला ती विकली’   6 त्याला कोणी विचारले, ‘तुझ्या छातीवर आणि पाठीवर हे घाव कशाचे आहेत?’ तेव्हा तो म्हणेल, ‘माझ्या मित्राच्या घरी या जखमा मला दिल्या आहेत!’   
मेंढपाळाचा वध, मेंढरांची दाणादाण 
  7 “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो,  
माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!”  
सर्वसमर्थ याहवेह म्हणतात,  
“मेंढपाळावर प्रहार कर,  
म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल,  
आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.”   
 8 याहवेह जाहीर करतात, “इस्राएलाच्या संपूर्ण राष्ट्रातील  
दोन तृतीयांश लोकांचा उच्छेद होईल व ते मरण पावतील,  
परंतु एकतृतीयांश लोक देशात उरतील.   
 9 हा तिसरा भाग अग्नीत घालून  
चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन.  
आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन.  
ते मला माझ्या नावाने हाक मारतील  
आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन;  
मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’  
आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”