सफन्याहची भविष्यवाणी
1
1 सफन्याहला, जो कूशीचा पुत्र, जो गदल्याहचा पुत्र, जो अमर्याहचा पुत्र, जो हिज्कीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा योशीयाह, जो आमोनचा पुत्र होता, याच्या कारकिर्दीत याहवेहकडून आलेले वचन ते असे:
याहवेहचा संपूर्ण पृथ्वीसाठी न्यायाचा दिवस
2 “मी पृथ्वीतलावरून सर्वकाही
झटकून नाहीसे करेन.”
असे याहवेह जाहीर करतात.
3 “मी माणसे आणि जनावरे दोन्हीही नष्ट करेन;
मी आकाशातील पक्षी नष्ट करेन
आणि समुद्रातील मासेही—
त्या मूर्ती ज्या दुष्टाच्या अडखळण्याचे कारण बनते.”
याहवेह जाहीर करतात,
“जेव्हा मी पृथ्वीवरून
सर्व मानवजातीला नष्ट करेन,
4 तेव्हा मी यहूदीयातील
आणि यरुशलेम येथील सर्व रहिवाशांच्या विरुद्ध माझा हात उगारेन.
या ठिकाणावरील बआलच्या सर्व शेष उपासकांचा मी नाश करेन
प्रत्येक मूर्तिपूजक पुजार्यांच्या नावाचा—
5 जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात
आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात.
जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात,
आणि मोलेख*किंवा मालकम दैवताचीही शपथ घेतात,
6 जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत
आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.”
7 सार्वभौम याहवेहपुढे स्तब्ध राहा.
कारण त्यांच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे;
याहवेहने अर्पण सिद्ध केले आहे;
ज्यांना त्यांनी आमंत्रित केले, त्यांचे पवित्रीकरण केले आहे.
8 याहवेहच्या अर्पणाच्या दिवशी
मी अधिपतींना आणि राजपुत्रांना
आणि परकीय वस्त्रे परिधान करणार्या
सर्वांना शिक्षा करेन.
9 त्या दिवशी या सर्वांना शिक्षा करेन
जे उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याचे टाळतात†1 शमु 5:5 पाहावे
जे त्यांच्या दैवतांची मंदिरे
हिंसाचार व लबाडीने भरतात.
10 याहवेह जाहीर करतात,
“त्या दिवशी मत्स्य वेशीपासून
एक मोठी आरोळी ऐकू जाईल,
नगरातील नव्या विभागातून विलापाचा ध्वनी,
आणि डोंगरातून मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू येईल;
11 विलाप करा, तुम्ही जे मक्तेशातील व्यापारी भागात राहता,
तुमचे सर्व व्यापारी,
सोन्याचांदीचा व्यवहार करणारे सर्वजण नष्ट होतील.
12 त्या समयी मी दिवा घेऊन यरुशलेममध्ये शोधेन
आणि जे बेफिकीर असतात,
जे पखालीत सोडलेल्या द्राक्षारसाच्या गाळासारखे आहेत,
जे विचार करतात की याहवेह आपले बरे किंवा वाईट
असे काहीही करणार नाहीत, अशांना शिक्षा करेन.
13 या लोकांची मालमत्ता लुटली जाईल,
यांचीच घरे ढासाळून टाकली जातील,
जरी त्यांनी घरे बांधली असतील,
त्या घरात ते राहू शकणार नाहीत;
जरी त्यांनी द्राक्षमळा लावला असेल,
द्राक्षांचा रस ते पिणार नाहीत.”
14 याहवेहचा तो भयावह दिवस जवळ—
तो वेगाने अगदी जवळ येत आहे.
याहवेहच्या दिवसाची गर्जना मर्मभेदक आहे;
सामर्थ्यशाली योद्धे त्याची रणगर्जना करतील.
15 तो दिवस क्रोधाग्नीचा दिवस असेल—
तो दिवस दुःखाचा व क्लेशाचा,
तो दिवस अरिष्ट व उजाडतेचा,
तो दिवस अंधकाराचा व उदासीनतेचा,
तो दिवस अभ्रांचा व निबिड काळोखाचा—
16 तो दिवस तटबंदीच्या नगरांविरुद्ध
आणि कोपऱ्यातील बुरुजा विरुद्ध
रणशिंगाचा व रणगर्जनांच्या निनादांचा असेल.
17 “मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्या
एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील,
कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.
त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल
व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील.
18 त्यांचे सोने किंवा त्यांची चांदी
त्यांना याहवेहच्या क्रोधापासून
वाचवू शकणार नाही.”
त्यांच्या ईर्षेच्या अग्नीने
संपूर्ण पृथ्वी भस्म होईल,
कारण जे सर्व पृथ्वीवर रहिवास करतात
त्यांचा ते अकस्मातपणे अंत करतील.