2
पवित्र आत्म्याचे दान
1 नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना.
2 अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले.
3 आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या.
4 तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
5 त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते.
6 तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले.
7 ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना?
8 तर आपण प्रत्येकजण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे?
9 पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आशिया,
10 फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी,
11 क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”
12 तेव्हा ते सर्व विस्मित होऊन; व गोंधळून जाऊन एकमेकांस म्हणाले, “हे काय असेल?”
13 परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे नवीन द्राक्षरसाने मस्त झाले आहेत.”
पेन्टेकॉस्टच्या वेळेचे पेत्राचा उपदेश
योए. 2:28-32
14 तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून, त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरूशलेम शहरातील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.
15 तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत.
16 परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे:
17 देव म्हणतो, “शेवटच्या दिवसात असे होईल,
मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन,
तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील.
तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील.
18 आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर
व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन,
म्हणजे ते संदेश देतील.
19 आणि वर आकाशात अद्भूते
व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ
अशी मी दाखवीन.
20 परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी
सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.
21 तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.”
22 “अहो इस्राएल लोकांनो, या गोष्टी ऐका: नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भूते व चिन्हे तुम्हास दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हास माहिती आहे.
23 तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, तुम्ही त्यास धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले;
24 त्यास देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.
25 दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो,
‘मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे;
मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे.
26 म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झालीच
आणखी माझा देह ही आशेवर राहील.
27 कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस,
व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
28 जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत;
ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’ ”
29 “बंधुजनहो, कुलाधिपति दावीद: ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.
30 तो संदेष्टा होता, आणि त्यास ठाऊक होते की देवाने त्यास अभिवचन दिले की तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन.
31 ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या: पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, त्यास मृतलोकात सोडून दिले नाही, व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.
32 त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत.
33 म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.
34 कारण दावीद राजा स्वर्गास चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो,
‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,
35 मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ ”
36 “म्हणून, इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्यास देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.”
37 हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”
38 पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
39 कारण हे वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत, त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे.”
40 आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून; म्हटले, “या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”
41 तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला, आणि त्यादिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार मनुष्यांची भर पडली.
ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन
42 ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
43 तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय वाटले, आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती.
44 तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही सामाईक होते,
45 ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत.
46 ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;
47 सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत, असलेल्या मनुष्यांची दररोज मंडळीत भर घालीत असे.